Thu, Apr 18, 2019 16:25होमपेज › Belgaon › कर्नाटक बदलेल देशाचे चित्र : सिद्धरामय्या

कर्नाटक बदलेल देशाचे चित्र : सिद्धरामय्या

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 1:07AMखानापूर, निपाणी : प्रतिनिधी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. त्यांनी चार वर्षांत काहीही केलेले नाही. कर्नाटकात काँग्रेस सरकारला स्पष्ट बहुमत मिळणार असून कर्नाटकच्या निकालाने देशाला वेगळी दिशा मिळेल, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

खानापूरच्या काँग्रेस उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या प्रचारार्थ खानापुरात, तर निपाणी काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील आणि चिक्कोडी उमेदवार गणेश हुक्केरी यांच्या प्रचारार्थ बेडकीहाळमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या. दोन्ही सभांमध्ये त्यांनी भाजपवर टीका केली.

सिद्धरामय्या पुढे म्हणाले,  गतवेळी सत्तेत असलेल्या भाजपला विकास करणे शक्य होते. आता केवळ बिनबुडाचे आरोप करण्याचे काम करण्यात येत आहे. 

काँग्रेस सरकार भ्रष्ट असल्याचे आरोप अमित शहा आणि नरेंद्र मोदी करतात;  पण भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली येडियुराप्पा जेल भोगून जामिनावर बाहेर आहेत. मोदींनी सांगितलेला विदेशातील काळा पैसा कोठे आहे? 2 कोटी युवकांना रोजगार देण्याचे भाष्य करणार्‍यांना 2 लाखही रोजगार देता आलेले नाहीत. 

भाजपच्या जाहिराती फसव्या आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले, भाजपमुळे दलित आणि बहुजन समाज अधोगतीकडे जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे भाजपचे तळागाळातूनच उच्चाटन करा.

निपाणी स्वतंत्र तालुका काकासाहेब, हुक्केरींमुळे

निपाणी स्वतंत्र तालुक्याची मागणी खा. प्रकाश हुक्केरी व तत्कालीन आ. काकासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळेच होऊ शकली, असे मुख्यमंत्री बेडकीहाळ सभेत म्हणाले.

नवखानापूरच्या निर्मितीसाठी डॉ. निंबाळकरांना साथ द्या

विपुल साधनसंपत्ती असूनही खानापूर तालुक्याचा विकास झालेला नाही. नवखानापूरच्या निर्मितीसाठी अंजली निंबाळकर यांना साथ द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी खानापुरात केले.