Fri, Jan 24, 2020 22:56होमपेज › Belgaon › श्रीमंत पाटील गैरहजरच 

श्रीमंत पाटील गैरहजरच 

Published On: Jul 21 2019 1:24AM | Last Updated: Jul 21 2019 12:59AM
मुंबई / बंगळूर : प्रतिनिधी  

मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल असलेले आ. श्रीमंत पाटील यांना भेटण्यावरून शनिवारी राजकीय नाट्य रंगले. मुंबईतल्या काँग्रेसच्या आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी श्रीमंत पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना पोलिसांनी रोखले. यावरून ठाकूर यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. 

बेळगाव जिल्ह्यातील कागवाडचे आ. श्रीमंत पाटील तीन दिवसांपासून मुंबईतल्या रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या छातीत दुखू लागले आहे; मात्र त्यांचे अपहरण  करण्यात आल्याची तक्रार काँग्रेसने सभापती रमेशकुमार यांच्याकडे केली होती. त्यानुसार सभापतींनी बंगळूर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.  बंगळूरचे डीसीपी सुरेश यांनी मुंबईला जाऊन श्रीमंत पाटील यांचा जबाब शनिवारी नोंदवून घेतला. मी स्वत:हून न्यायालयात दाखल असून अपहरण झालेले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान मुंबईतल्या काँग्रेसच्या आ.ठाकूर यांनी शनिवारी सेंट जॉर्ज रूग्णालयात पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाटील यांचे पुत्र श्रीनिवास यांनी त्यांना भेटीची परवानगी दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडविले. त्यानंतर ठाकूर यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. सरकारच्या संमतीनेच हा प्रकार सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

आ.पाटील यांचे पत्र

आ.श्रीमंत पाटील यांनी विधानसभा सभापती रमेशकुमार यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मी चेन्नईला गेलो असतानच माझ्या छातीत दुखू लागले. डॉक्टरांशी चर्चा केली असता त्यांनी मुंबईला येण्यास सांगितले. त्यामुळे मुंबईला आलो असून मला विधिमंडळ अधिवेशनाला हजर राहता येणार नाही. तरी अनुपस्थितीत राहण्याची मुभा द्यावी. माझे कोणीही अपहरण केलेले नाही, मी स्वेच्छेने मुंबईला आलो आहे.