Tue, Nov 19, 2019 11:43होमपेज › Belgaon › शॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार

शॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार

Published On: May 06 2018 1:07AM | Last Updated: May 06 2018 12:20AMबेळगाव : प्रतिनिधी

बसवण कुडची येथे शुक्रवारी रात्री उशिरा शॉर्टसर्किटने मिथुन अर्जुन बेडका यांच्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. यामध्ये संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत एका जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच नवीन दुचाकी आगीत भस्मसात झाली आहे. जवळपास 15 लाखापेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले असून दुभती जनावरे गंभीर जखमी झाली आहेत.

शुक्रवारी रात्री अचानक विजांचा कडकडाट होऊन झालेल्या वादळी पावसामुळे वीज खंडित झाली होती. दरम्यान, झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. बेडका यांच्या घराशेजारीच जनावरांचा गोठा आहे. आग लागल्यानंतर जनावरांनी जोरजोरात हंबरायला सुरूवात केली. जनावरांचा आवाज ऐकून  रात्री 12 च्या दरम्यान जागे झालेल्या मिथुन बेडका यांनी सदर घटना निदर्शनास येताच आरडाओरड केली व शेजार्‍यांना जाग केले. गोठ्यातील जनावरे बाहेर काढण्यासाठी मिथुन यांनी जनावरांच्या गोठ्यात प्रवेश केला. दरम्यान मिथुन यांच्या खाद्यावर गोठ्यातील लाकडी तुळी पडल्याने  तेही गंभीर जखमी झाले आहेत. 

आगीने रुद्ररूप धारण केल्याने गोठ्यामध्ये प्रवेश करणे अशक्य झाले. यात गोठ्यातील बैल जागीच होरपळून ठार झाला. गोठ्यात जनावरांच्या सुक्या चार्‍यासह शेती उपयोगी लाकडी अवजारे  यामध्ये जळून खाक झाले आहेत. यामध्येच जळणासाठी आवश्यक असणारी लाकडी साहित्य असल्यानेच आगीने पेट घेतला होता.  

जवळपास 1 लाख रु. किंमतीची असणारी बैलजोडीमधील एक बैल आगीत मृत्युमुखी पडला आहे. तसेच तीन म्हशी जळून जखमी झाल्या आहेत. बचावलेल्या जनावरांची दृष्टी गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

गोठ्याशेजारी असाणार्‍या मोकळ्या जागेत जनावरांसाठीच्या गवतगंजीलाही आग लागून जवळपास 4 ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे.  बेडका यांच्या दुसर्‍या मजल्यावरील घरातील साहित्यालाही झळ बसले आहे. घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली होती. मात्र अग्निशामक दलाकडून याची वेळेत दखल घेतली गेली नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहेत.   घटनेची माहिती माळमारुती पोलिसांना समजताच पहाटे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.  

या आगीत नवीन दुचाकीही जळून खाक झाली आहे. यामुळे बेडका कुटुंबियांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्रशासनाने याची तत्काळ दखल घेऊन बेडका कुटुंबियांना आर्थिक  सहाय्य देऊन मदत करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.