बेळगाव : प्रतिनिधी
सध्या चलनात असलेली पन्नास रुपयाची जुनी नोट दुकानदार स्वीकारण्यास तयार नसल्याने दुकानदार व ग्राहकांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत आहेत.
सध्या नव्याने चलनात असलेल्या पन्नास रुपयांसह शंभर, पाचशे, हजार अशा नोटांच्या मागील भागावरील खालच्या बाजूला मध्ये 2017, 2018 असे आकड्यांमध्ये ‘साल’ छापण्यात आले आहे. परंतु पूर्वीच्या चलनात असलेल्या पन्नास रुपयाच्या नोटेवर साल नसल्याने चलनात असूनही अशा नोटा स्वीकारण्यास दुकानदार तयार होत नाहीत. त्यामुळे अशा नोटा असलेल्यांची पंचाईत होत आहे.
मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 रुपयांच्या चलनातील जुन्या नोटा रद्द केल्यानंतर सार्यांचेच धाबे दणाणले होते. यानंतर नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. अशा नोटांवर ‘साल’ छापण्यात आले आहे. नव्या पन्नास रुपयांच्या नोटांवरही सालचा आकडा आहे. यामुळे पन्नास रुपयांची जुनी नोट चलनात असूनदेखील दुकानदार त्या स्वीकारण्यास तयार होत नसल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होते.
दुकानांतून खरेदी करताना प्रत्येकाची घाईगडबड होत असल्याने नोटा घेतल्या जातात. अशा नोटांमधून एखादी पन्नास रुपयांची साल न छापलेली नोट आल्यास लक्षात येत नाही. परत ती नोट दुसर्या एखाद्या दुकानात दिल्यास बहुसंख्य दुकानदार त्यावर साल आहे की नाही, हे पडताळून घेत असल्याने ती परत ग्राहकाकडेच राहते. त्यावरून दुकानदार व ग्राहकांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. आता ग्राहकही हातात पन्नास रुपयांची नोट आल्यास त्यावर साल छापले आहे की, नाही हे पडताळताना दिसतो. पण अशी पन्नास रुपयाची नोट चलनात असल्याने काही समजूतदार दुकानदार अशा नोटा स्वीकारतात. मध्यंतरी सध्या चलनात असलेली दहा रुपयाची नाणी स्वीकारावीत की नाही, याविषयीची चर्चा आहे.