होमपेज › Belgaon › दुबईत अवतरली शिवसृष्टी!

दुबईत अवतरली शिवसृष्टी!

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:08AMएकसंबा : वार्ताहर

दुबई येथील एक्स्पो सेंटर शारजाह येथे आयोजित शिवजयंती उत्सवात इन्स्पायर इव्हेंटस् आणि प्रमोशनतर्फे बेळगावच्या सागर जाधव यांनी स्थापन केलेल्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाचे सादरीकरण आकर्षण ठरले. जयंती कार्यक्रमातून दुबईतही शिवसृष्टी अवतरली.

दुबईच्या एक्स्पो सेंटर शारजाह येथे पार पडलेल्या शिवजयंती उत्सवाच्या शाही सोहळ्यात पोवाडा,  नृत्य सादरीकरण करण्यात आले. सागर जाधव यांच्या नेतृत्वाखालील त्रिविक्रम ढोलताशा पथकाचा बहारदार कार्यक्रम पार पडला. ढोलताशाचा निनाद, लेझीम पथक, ध्वजपथक, झांजपथक, लाठी काठी  असे कार्यक्रम सादर करण्यात आले.

संगीत आणि वादनाची आवड असलेले सागर पाटील बेळगाव येथे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीनिमित्त दुबईत गेले. त्यांनी जानेवारी 2017 मध्ये त्रिविक्रम ढोलताशा पथकाची स्थापना केली. आजतागायत 15 महिन्यात दुबईत 20 कार्यक्रम सादर केले आहेत. कार्यक्रमात सागर पाटील, तुषार पाटोळे, प्रवीण जोगळे, वर्धन सोहनी, धर्मीन सांगवी, सतीश पेडणेकर, आकाश जाधव, रुषी सबनीस, यशस्वी शहा, गणेश सावंत, मार्तंड  मजलेकर, गौरी महाजन, दीप्ती भोसले, पल्लवी यादव, जान्हवी गोखले, सूर्यकांत सुतार या मराठमोळ्या कलाकारांचा सामावेश  होता. सुमारे 1500 पेक्षा अधिक दुबईवासीयांनी सोहळा पाहिला.