Tue, Jun 18, 2019 22:23होमपेज › Belgaon › शिवरायांचे दुर्लक्षित शिल्प होणार संरक्षित

शिवरायांचे दुर्लक्षित शिल्प होणार संरक्षित

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 10:59PMबेळगाव : प्रतिनिधी

छ. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आणि पराक्रमाची साक्ष देणारे त्यांचे जगातील पहिले ऐतिहासिक शिल्प यादवाड (जि. धारवाड) येथील एका मंदिरात उघड्यावर पडले आहे. यामुळे कोल्हापूरच्या सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राच्या पदाधिकार्‍यांनी धारवाडचे पालकमंत्री विनय कुलकर्णी  यांची भेट घेऊन माहिती दिली. यामुळे खडबडून जागे झालेल्या अधिकार्‍यांनी शिल्प जतन करण्याचे आश्‍वासन दिले.

छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे पहिले शिल्प धूळ खात पडले आहे. बेळवडी मल्लाबाई यांचा सन्मान करणारे व शिवरायांच्या कर्तृत्वाची साक्ष ठरणारे शिल्प हुबळी जिल्ह्यातील यादवाड येथे अनेक दिवसापासून उघड्यावर पडले आहे. यामुळे शिल्पाला धोका निर्माण झाला असूने सह्याद्री इतिहास संशोधन मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी यादवाडला भेट दिली.

शिल्पाचे ऐतिहासिक महत्त्व

छ. शिवाजी महाराज 1678 साली दक्षिण दिग्विजय करून माघारी परतत असताना गदग प्रांतातील बेळवडी गढीस वेढा घातला. वेढ्याचे काम सखोजी गायकवाड यांच्यावर सोपवून महाराज पन्हाळ्याला गेले. सरदार येसाजी प्रभू देसाई यामध्ये मारला गेला. त्याची पत्नी मल्‍लाबाईनेे पुरुष वेशधारी सैन्यासह विरोध केला. यावेळी शिवाजी महाराज या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी तिच्या धाडसाचे कौतुक करत मल्‍लाबाईला बेळवडी संस्थान तिच्या मुलाला दूधभातासाठी परत केले. ही आठवण कायम राहावी म्हणून मल्‍लाबाईने हे शिल्प कोरल्याचे सांगण्यात येते.