Thu, Apr 25, 2019 03:57होमपेज › Belgaon › शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांची दादागिरी

शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांची दादागिरी

Published On: Feb 27 2018 2:05AM | Last Updated: Feb 27 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील पुरोगामी व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचे मराठा मंदिर सभागृहात होणारे व्याख्यान शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी घोषणाबाजी केल्यामुळे रद्द करण्यात आले. परिणामी, कार्यकर्त्यांच्या दादागिरीमुळे मराठा मंदिरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

येळ्ळूरच्या नवहिंद को-ऑप. सोसायटीच्या रौप्यमहोत्सवानिमित्त शनिवारपासून कार्यक्रम सुरू आहेत. सोमवारी कोकाटेंचे शिवचरित्रावर व्याख्यान होते; पण व्याख्यान सुरू होण्याआधीच शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.

व्याख्यान सायंकाळी साडेपाच वाजता होते. त्याआधीच शिवप्रतिष्ठानच्या  कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष किरण गावडे यांच्या नेतृत्वाखाली मराठा मंदिर सभागृहाच्या प्रवेशद्वाराला घेराव घातला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू करून कोकाटे यांचे व्याख्यान होऊ देणार नाही, असा इशारा दिला.  श्रीमंत कोकाटे यांनी रामदास स्वामी, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि हिंदू धर्माबाबत अतिशय हलक्या शब्दांत टीका केली आहे, असा कार्यकर्त्यांचा आक्षेप होता. 

या प्रकाराच्या लिखाणामुळे  हिंदूधर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे त्यांचे व्याख्यान थांबवावे, असे कार्यकर्त्यांनी संयोजकांना सुनावले. परंतु, सुरुवातीला संयोजकांनी कार्यक्रम होणारच अशी भूमिका घेतली. यावर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांनी सावरकर व गणेश प्रतिमेचे पूजन करून व्याख्यान सुरू करावे, असा तोडगा सूचविला.

यावर संयोजकांनी कोकाटे यांच्याशी संपर्क साधून पूजेबाबत विचारणा केली; मात्र कोकाटेंनी पूजा करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त बनले. कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम होऊ देणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. दरम्यान, पोलिस अधिकारी देशनूर यांनी घटनास्थळी धाव घेतली.  कोणाच्याही मत स्वातंत्र्यावर आळा घालणे कायदेशीर नाही, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले; पण काही कार्यकर्त्यांनी  त्यांच्याशी हुज्जत घालण्याचा  प्रयत्न केला. वाद वाढत असल्याचे पाहून अखेर संयोजकांनीच व्याख्यान रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला.