होमपेज › Belgaon › शिवजयंती मिरवणुकीत चित्ररथ संख्येत घट

शिवजयंती मिरवणुकीत चित्ररथ संख्येत घट

Published On: May 21 2018 1:11AM | Last Updated: May 20 2018 10:58PMबेळगाव : प्रतिनिधी

यंदा विधानसभा निवडणूक आचारसंहितेमुळे बेळगावातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक 19  मे रोजी काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे  साक्षात शिवसृष्टी बेळगावात उतरल्याचा भास होतो. यामध्ये बेळगावसह उपनगरातील शिवजयंती उत्सव मंडळे उत्साहाने भाग घेतात. यंदा मात्र मिरवणुकीत दरवर्षीपेक्षा कमी चित्ररथ असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.  

सजीव देखावे सादर करण्यासाठी मंडळांना  मिळालेला कमी अवधी, पावसाचे वातावरण आणि देखावा सादर करण्यासाठी ट्रकच्या चेस्सी न मिळल्याने चित्ररथांची संख्या कमी दिसून आली. दरवर्षी 150 च्या आसपास चित्ररथ असतात. यंदा केवळ 46 मंडळांचे चित्ररथ पाहावयास मिळाले. त्यापैकी 16 मंडळांनी सजीव देखावे सादर केले होते.

दरवर्षी शिवजयंती उत्सव बेळगावात मोठ्या उत्साहात साजरा होतो. पण यंदा आचारसंहितामुळे निवडणूक काळात चित्ररथ मिरवणूक काढता आली नाही. चित्ररथ मिरवणूक निवडणूक निकालानंतर 19 मे अथवा 24 मे रोजी काढण्याचे मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या बैठकीत ठरले. निवडणूक निकालानंतर लगेचच 19 मे रोजी मिरवणूक काढण्याचा आग्रह शहरातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धरला.  त्यामुळे चित्ररथ मिरवणुकीत सजीव देखावे सादर करण्यासाठी वेळ मिळाला नाही.

देखाव्यांचा अभाव 

यंदा चित्ररथावर सजीव देखावे सादर करण्यासाठी कार्यकर्त्यांना तयारीसाठी वेळ कमी पडला. देखावा सादर करण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, वेशभूषा, मेकअप, प्रसंगानुसार देखाव्याचे सादरीकरण करण्यासाठी कमीतकमी आठ दिवस वेळ पाहिजे होता. तयारी करण्यास कमी वेळ मिळाल्याने काही मंडळांनी केवळ चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ठेवून मिरवणुकीत सहभागी होणे पसंद केले.

चेस्सीची कमतरता 

बेळगावात ट्रकच्या चेस्सी बनविण्याचे काम चालते. शिवजयंती काळात अल्पदरात या चेस्सी उपलब्ध होत असतात. मात्र यंदा चेस्सी मंडळांना मिळाल्या नाहीत. महाराष्ट्रात चेस्सी बनविण्याचे काम चालत असल्याने बेळगावात काम येणे बंद झाले. त्याला पर्याय म्हणून ट्रॅक्टरच्या चेस्सी मिळविण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. चेस्सी न मिळाल्याने मंडळांना इच्छा असूनदेखील सजीव देखावा सादर करता आला नाही.

निवडणुकीत पराभव  

विधानसभा निवडणुकीत म. ए. समितीच्या अधिकृत सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्याचे पडसाद मिरवणुकीत उमटले. काही मंडळांनी तयारी नसल्याचे कारण  देत मिरवणुकीत सहभाग दर्शविला नाही.

डॉल्बीवर बंदी

दरवर्षीप्रमाणे डॉल्बी लावलेल्या मंडळांवर मिरवणुकीनंतर व मिरवणुकीदरम्यान कारवाई होत असल्याने मंडळाचे कार्यकर्ते प्रशासनावर नाराज होते. त्याचाही परिणाम मिरवणुकीवर झाला. काही मंडळांनी मात्र डॉल्बीच्या तालावर चित्ररथ  मिरवणुकीत सहभाग दर्शविला.

मराठी नगरसेवकांनी फिरविली पाठ

दरवर्षी शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीच्या उद्घाटनाला दिग्गज नेत्यांसह आमदार, मराठी नगरसेवकांची उपस्थिती आवर्जुन असते. मात्र यंदा मराठी नगरसेवकांबरोबर बंडखोर उमेदवारांनीदेखील मिरवणुकीकडे पाठ फिरविल्याची चर्चा सुरू होती.

मराठी नगरसेवकांनी चित्ररथ मिरवणुकीला दांडी मारुन पुन्हा समितीमध्ये बेकी असल्याचे दाखवून दिले असल्याची चर्चा सुरू होती. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या नेतृत्वाखाली बेळगाव उपनगरातील मंडळे चित्ररथ मिरवणूक काढतात. या ठिकाणी देखील अंतर्गत कलह दिसून येत आहे. एकाच छताखाली येऊन कार्यक्रम करताना सतत विरोध करण्याचे काम जाणीवपूर्वक काही लोक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीत मिरवणुकीत राजकरण आणण्याचा प्रयत्न केला. त्याला इतर मंडळांनी विरोध करत सार्वजनिक मिरवणुकीत राजकरण नको असा सल्ला दिला होता.