बेळगाव : प्रतिनिधी
बोलिव्हिया या देशातील आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात बेळगावचे चित्रकार शिरिष देशपांडे यांच्या कलाकृतीचा सन्मान करण्यात आला आहे. सुमारे महिनाभर चालणार्या या चित्रप्रदर्शनासाठी भारतातून एकूण 9 चित्रकारांनी आपली चित्रे पाठवून दिली आहेत.
सदरचे चित्रप्रदर्शन बोलिव्हिया इंटरनॅशनल वॉटर कलर सोसायटीमार्फत आयोजित करण्यात आले आहे. बोलिव्हियात होणारे हे पहिले द्विवार्षिक चित्रप्रदर्शन असून 45 देशांतून 155 चित्रकारांची चित्रे या प्रदर्शनासाठी मागविण्यात आली होती. डिसेंबर ते मार्च दरम्यान बोलिव्हियातील तीन शहरांत टप्प्याटप्प्याने चित्रप्रदर्शन पार पडणार आहे. या चित्रप्रदर्शनासाठी देशपांडे यांनी 80 डॉलर म्हणजेच 6,200 रुपये शुल्क भरले आहे. बोलिव्हियात चार महिने चालणार्या या चित्रप्रदर्शनानंतर उत्कृष्ट चित्र कलाकृतीला सन्मानित करण्यात येणार आहे.
भारतातून एकूण 25 चित्रकारांच्या चित्रांची निवड करण्यात आली होती. मात्र, यासाठी फक्त 9 चित्रकारांनी आपली चित्रे पाठवून दिली आहेत. यामध्ये दिल्लीतील अमित कपूर व मेघा कपूर यांच्या चित्रांचा समावेश आहे. चित्रप्रदर्शनात देशपांडे यांनी रेखाटलेल्या ‘जलरंगातील’ चित्रकृतीचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वीही देशपांडे यांनी राष्ट्रीय पातळीवरील चित्रप्रदर्शनात भाग घेतला आहे. उत्कृष्ट चित्रकार म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. चित्रप्रदर्शन झाल्यानंतर प्रत्येक चित्रकाराला चित्रांचा संच करून देण्यात येणार आहे. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी प्रदर्शनात मांडण्यासाठीदेखील हा संच देण्यात येतो, अशी माहिती शिरीष देशपांडे यांनी दिली.