Thu, Jun 20, 2019 00:33होमपेज › Belgaon › चक्‍क ग्रामपंचायतीचे स्वतःचे अ‍ॅप

चक्‍क ग्रामपंचायतीचे स्वतःचे अ‍ॅप

Published On: Mar 24 2018 1:46AM | Last Updated: Mar 23 2018 8:53PMबेळगाव : प्रतिनिधी 

गावातील घरांना शुद्ध पिण्याचे पाणी, कचर्‍याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट, ग्राम पंचायत बैठकीचे थेट प्रक्षेपण, संगणकीय व्यवहार अशा गुणात्मक कार्यामुळे आदर्श ग्राम म्हणून पुरस्कार मिळविलेल्या शिरगुप्पी ग्राम पंचायतीने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्राम पंचायतीने स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. अ‍ॅप च्या माध्यमातून अनेक सुविधा पुरवून नावलौकिक मिळविला आहे. 

गावामध्ये स्मार्ट फोन वापरणार्‍यांची संख्या वाढली आहे. यासाठी ग्रा. पं. संदर्भातील तक्रारी व सल्ला-सूचना देण्यासाठी या अ‍ॅपचा वापर करण्यात येत आहे. अशा प्रकारचा अ‍ॅप तयार करण्याचा मान राज्यामध्ये शिरगुप्पी ग्रा. पं. ला मिळाला आहे. नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या ग्रा. पं. शिरगुप्पी अ‍ॅपने मोठी प्रगती साधली आहे. गुगल स्टोअरवरून मोफत अ‍ॅप डाऊनलोड करणे शक्य झाले आहे. यासाठी नाव, स्थळ आणि मोबाईल क्रमांक देणे गरजेचे आहे. 

वाढत्या संगणक वापराच्या युगात अशा अ‍ॅपचा अत्याधुनिक उपयोग करून घेऊन तांत्रिक सेवांचा लाभ करून घेणे शक्य होणार आहे. डिजीटल इंडिया मिशनला पूरक ठरण्याच्या दृष्टीने हा अ‍ॅप तयार केला आहे. ग्रा. पं. व्याप्तीमध्ये 9800 पेक्षा अधिक लोकसंख्या आहे. अनेकांकडे स्मार्टफोन आहे. ते  इंटरनेटचा लाभ घेतात. सध्या एक हजारपेक्षा अधिक जणांनी या अ‍ॅपचे डाऊनलोडिंग केले आहे. ग्राम पंचायतीकडून मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती पंचायतीचे क्‍लार्क पद्मनाभ कुंभार यांनी दिली. 

पंचायतीकडून हाती घेण्यात आलेल्या सर्व कामांची माहिती, विकासकामे, लोकप्रतिनिधी, ग्रा. पं. मधील कर्मचारी या संदर्भातील माहिती तसेच सुरू असलेली विकासकामे, असा तपशील अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध होतो. गावामध्ये कोणतेही काम हाती घेतल्यानंतर त्या संदर्भातील फोटो आणि माहिती तात्काळ अपलोड केली जाते. सभा, कार्यक्रम यांचीही माहिती दिली जाते. नागरिकांना कोणतीही तक्रार अ‍ॅपच्या माध्यमातून करता येते. नागरिकांना आता कोणत्याही कामासाठी ग्रा. पं. ला यावे लागणार नाही. दाखल केलेल्या तक्रारीवर तात्काळ संबंधितांकडून संवाद साधला जातो. ग्रा. पं. मधील सर्व सदस्यांच्या निर्णयानेच खासगी कंपनीकडून हा अ‍ॅप तयार करण्यात आला आहे.  

150 लाऊडस्पीकर

गावामध्ये विविध ठिकाणी 150 लाऊडस्पीकर बसविण्यात आले आहेत. ग्रा.  पं. कडून हाती घेण्यात आलेल्या कार्यक्रमाची माहिती, सूचना या माध्यमातून पोहोचविण्यात येते. गावपातळीवरील दवंडी पथक आता नामशेष होत असल्याने हा उपाय शोधल्याचे ग्रा. पं. कडून सांगण्यात आले.

 

Tags : belgaon, belgaon news, Shirguppi, Gram Panchayat, app,