Fri, Apr 26, 2019 19:43होमपेज › Belgaon › शिनोळीत उद्या ‘मराठा’ आंदोलन 

शिनोळीत उद्या ‘मराठा’ आंदोलन 

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 28 2018 12:06AMबेळगाव : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबरोबर सीमाप्रश्‍नाची आग्रही मागणी घेऊन शिनोळी येथे रविवारी (दि.29) होणार्‍या आंदोलनात बेळगावमधून हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, शहरातून निघताना प्रत्येकाने शांतता पाळावी आदी निर्णय घेण्यात आले. 

सकल मराठा समाजाची रामलिंगखिंड गल्लीतील जत्तीमठात शुक्रवारी शिनोळी येथे होणार्‍या आंदोलनाची पूर्वतयारी करण्यासाठई बैठक पार पडली. रविवारी  सकाळी 10 धर्मवीर संभाजी चौकातून महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समाजबांधव निघणार आहेत.

गेल्या वर्षी महाराष्ट्रभर मोर्चे निघूनही मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्र व केंद्र सरकार ठोस निर्णय घेत नसल्यामुळे आता महाराष्ट्रात मराठा समाजाने ठोक आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठीच तसेच सीमाप्रश्‍नाकडे पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिनोळीत बेळगावचा सकल मराठा समाज आंदोलन छेडणार आहे.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरातील लोकांना व मित्रमंडळींना यामध्ये सामावून घेणे. रविवार असल्याने कामगारांना सुट्टी असते. त्यामुळे प्रत्येकाने 2 ते 3 जणांना सोबत घेणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेट परिधान करून आंदोलनाला येणे, असेही निर्णय घेण्यात आले.  

गुणवंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्याबरोबर बेळगावकरांसाठी सीमाप्रश्‍नाचा मुद्दा महत्वाचा आहे. यासाठी सीमाप्रश्‍नाची मागणीही या आंदोलनात असणार आहे. मराठा व मराठी टिकण्यासाठी अशी आंदोलने आयोजित करणे गरजेचे आहे. शिवराज पाटील, प्रकाश मरगाळे, प्रकाश शिरोळकर संजय मोरे, राजु मरवे, सतीश देसाई, एम. वाय. घाडी, प्रसाद बरगाळे, केदारी करडे, धनंजय पाटी, गणेश दड्डीकर, नितीन आनंदाचे, प्रविण तेजम आदी उपस्थित होते.