होमपेज › Belgaon › शिनोळीचा जुगारअड्डा कधी बंद होणार?

शिनोळीचा जुगारअड्डा कधी बंद होणार?

Published On: Jun 01 2018 1:43AM | Last Updated: May 31 2018 8:33PMबेळगाव : प्रतिनिधी 

बेळगाव-चंदगड मार्गावर बेळगाव पासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या शिनोळी खुर्द येथे सुमारे 50 वर्षापासून जुगार, मटका अड्डा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी चंदगड पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकून बेळगाव परिसरातील 10 तरुणांना पकडले आहे. त्यामुळे अड्ड्याच्या कारवाया पुन्हा चर्चेला आल्या आहेत. अड्ड्यामुळे तरुणाई बरबाद होत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. निरीक्षक अशोक पवार, उपनिरीक्षक राहुल पाटील यांनी अड्ड्यावर धाड टाकली.

मुंबई गँगस्टरशी होते कनेक्शन 

शिनोळी येथील मटका अड्ड्यावर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यावर मुंबई येथील गँगस्टरांचा डोळा होता. त्यातूनच चंदगड तालुक्यातील रहिवाशी व छोटा राजन टोळीचा सदस्य बाळू ढोकरे याच्या गँगने काही वर्षापूर्वी या अड्ड्यावर दरोडा टाकून लाखो रुपयांवर डल्ला मारला होता. 

50 वर्षे रंगला चोर-पोलिसांचा खेळ 

1982 साली तत्कालीन कोल्हापूर पोलिस अधिक्षक तथा जिल्हा पोलिस प्रमुख मीरा बोरवणकर यांनी आपल्या सहकार्‍यांसह स्वतः पुढाकार घेऊन कारवाईचा धडाका लागला होता. या नंतरच्या 35 वर्षात कोणत्याही आयपीएस अधिकार्‍याने स्वतः पुढाकार घेवून कारवाईचा धडाका लावल्याचे निदर्शनास आले नाही. ज्या -ज्या वेळी कारवाई झाली त्या-त्या वेळी कनिष्ठ अधिकारीच छापा टाकतात. बहुतांशवेळा जुजबी कारवाई करून हात वर करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळेच हा अड्डा गेल्या 50 वर्षापासून आजतागायत सुरू आहे. 

महिपाळगड, वैद्यनाथ परिसर बदनाम  

महिपाळगड व प्राचीन वैद्यनाथ देवस्थान सीमाभागात प्रसिद्ध आहे. या गडाच्या पायथ्याशी शिनोळी खुर्द वसले आहे. गडाकडे व देवस्थानकडे जाणार्‍या मार्गावरच अड्डे सुरू आहेत. त्यामुळे जुगारी व मध्यवर्तींची वर्दळ मोठी आहे. त्यांची खाणपानएची व्यवस्था मोठी आहे. या सार्‍या प्रकारामुळे महिपाळगड व वैद्यनाथ परिसरातील पावित्र्य राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून परिसरच बदनाम होत आहे. 

जुगार, मटका किंगच सापडेना  

अड्डा चंदगडी अन् किंग कर्नाटकी अशी कुप्रसिद्धी शिनोळी गावची होत आहे. स्थानिकांचे सहकार्य असल्याशिवाय हा अड्डा मोठ्या प्रमाणात विस्तारणे अशक्य आहे. मात्र, या ठिकाणी खेळणारे जुगारी हे सर्व कर्नाटकातील आहेत. प्रामुख्याने बेळगाव शहर, बैलहोंगल, रामदुर्ग, गोवा, हुबळी, सांगली, निपाणी येथील जुगार्‍यांना हा अड्डा सोयीचा ठरला आहे. अड्डा चालक परगावचे आहेत. शिनोळी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना, विविध स्पर्धांसाठी सढळ हस्ते मदत करत आहेत. त्यामुळे त्यांनी वेगळी सहानुभूती निर्माण केली आहे. 

स्थानिक चिडीचूप

गेल्या 50 वर्षापासून या ठिकाणी असणार्‍या अड्ड्यावर वारंवार कारवाई होत आहे. दिवस पुढे जातात आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ असा प्रकार नेहमी घडत आहे. अड्ड्यात खेळणारे स्थानिक जुगारी कमी, तर बेळगावचेच अधिक आहेत. बेळगावमधील अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत. हा सारा उद्योग बंद करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांकडून उठाव का होत नाही, असा सवाल आहे.