Fri, Apr 19, 2019 11:58होमपेज › Belgaon › शिमला करणार बेळगावची कॉपी!

शिमला करणार बेळगावची कॉपी!

Published On: Jul 14 2018 12:54AM | Last Updated: Jul 14 2018 12:54AMबेळगाव : प्रतिनिधी

जागतिक बँकेच्या सहकार्याने बेळगाव महापालिकेने शहरातील  10 वॉर्डांमध्ये 24 तास पाणी योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवून ती यशस्वी करून दाखविली आहे. तशीच योजना शिमल्यामध्येही राबवू आणि यशस्वी करून दाखवू, असा निर्धार शिमला महापालिकेने केला आहे.बेळगावच्या 24 तास पाणी योजनेचा अभ्यास करण्यासाठी शिमल्याचे उपमहापौर राकेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांचे शिष्टमंडळ शुक्रवारी बेळगावात दाखल झाले. त्यांना महापालिकेत योजनेची माहिती देण्यात आली. त्यावेळी शर्मा बोलत होते.

या शिष्टमंडळाने हुबळी-धारवाड महानगरपालिकेला व हल्याळ नगरपालिकेलाही भेट देऊन तिथल्या पाणी योजनांची पाहणी केली. बेळगावच्या योजनेबाबत शर्मा म्हणाले, पाणी योजनेचे व्यवस्थापनही वाखणण्याजोगे आहे. ही योजना शिमला महानगरपालिका राबवेल. बेळगाव महापालिकेने शहरामध्ये रस्त्यांच्या बाजूने व खुल्या जागांवर वृक्षारोपण करून संवर्धन केले आहे, हेही कौतुकास्पद आहे. कर्नाटक शहर पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकार्‍यांनी स्लाईड शोद्वारे बेळगाव शहरात राबविण्यात आलेल्या 24 तास पाणी योजनेची माहिती शिमला शिष्टमंडळाला दिली. ही योजना बेळगाव शहरातील उर्वरित 48 वॉर्डामध्येही राबविण्यात येणार असून या योजनेला जागतिक बँकेकडून 663 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ही योजना दोन टप्प्यात अंमलात आणली जाणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. 

त्यावर शिमला पालिकेचे अधीक्षक अभियंता धर्मेंद्र गिल म्हणाले, पाणी 6 मीटर उंचीपयर्ंत समान दाबाने मिळते हे चांगले आहे.  शिमला महानगरपालिकेमध्ये 24 तास पाणी योजना राबविण्यासाठी आम्हला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. प्रमुख समस्या म्हणजे  खोलवरील पाणी उंचावरच्या भागामध्ये पुरवठा करण्यासाठी पंपिंग करावे लागणार आहे. तेथील भू-भाग हा नैसर्गिकदृष्ट्याच उंच सखल असल्याने 24 तास पाणी योजनेसाठी आम्हाला अनेक ठिकाणी पाणी पंपिंग करावे लागणार आहे. विद्युत बिलापोटी शिमला महानगरपालिका दरवर्षी 70 कोटी रुपयांचे बिल भरते. तेथील नागरिकांना 24 तास पाणी उपलब्ध करून देण्याकरिता आम्ही ही योजना शिमल्यामध्ये राबविणारच. 

शिमला महानगरपालिकेच्या शिष्टमंडळामध्ये उपमहापौर राकेश शर्मा, नगरसेविका तनुजा चौधरी, किरण बावा, सुशमा कुंतीआला, आरती चौहाण, सत्या कुंदल, कामलेश मेहता, शारदा चौहाण, मीरा शर्मा, रेणू चौहाण, नगरसेवक विवेक शर्मा, दिवाकर शर्मा, कुलदीप ठाकूर, राकेश चव्हाण, सहाय्यक अभियंता डी. डी. मिश्रा, गोपेश बेहल, नगर मुलभूत सुविधा तज्ञ अभिशेख सेगल, कनिष्ठ अभियंता राजेश मंदोत्रा व ईश्‍वर ठाकूर यांचा समावेश होता.