Tue, Mar 19, 2019 09:15होमपेज › Belgaon › मेंढीपालन व्यवसाय दुष्काळाच्या छायेत 

मेंढीपालन व्यवसाय दुष्काळाच्या छायेत 

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 02 2018 8:48PMबेळगाव : प्रतिनिधी

मेंढीपालन व्यवसाय यंदा दुष्काळाच्या छायेत सापडला आहे. यामुळे मेंढपाळांची चारा-पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. इतरत्र चार्‍यासाठी वेगळी जागा उपलब्ध नसल्याने व कडक उन्हाच्या तीव्रतेने तळे, खाणीतील साठेलेले पाणी आटले आहे. यामुळे मेंढपाळ वणवण भटकत आहेत. 

पारंपरिक व वडिलोपार्जित पद्धतीने हा व्यवसाय केला जातो. सध्या मोजक्याच गावातील धनगर बांधव शेळ्या, मेंढ्यांचा व्यवसाय करीत आहेत. शेकडो रिकाम्या हातांना उद्योग देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. परंतु दुर्लक्षित असलेल्या या व्यवसायाला प्रगतीची दारे अजूनही खुली झालेली दिसत नाहीत. त्यामुळे दरवर्षी येणार्‍या दुष्काळाचा सामना येथील व्यावसायिकांना करावा लागतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असतानाही हे व्यावसायिक आपल्याच  दिनचर्येत खूश दिसतात.

बेळगाव तालुक्यातही अनेक मेंढपाळ व्यावसायिक आहेत. गोकाक, रायबाग, नरगुंद आदी ठिकाणाहूनही मेंढपाळ मेंढ्या घेऊन येतात. सध्या पश्‍चिम भागातील अनेक गावांत या मेंढपाळांचे वास्तव्य आहे. येथे हिरवा चारा नसल्याने त्यांना वणवण फिरावे लागत आहे. पावसाळ्याला सुरुवात होणार असल्याने काही मेंढपाळांनी परतीचा मार्ग पत्करला आहे. 
निरनिराळ्या जातींच्या वृक्षांचा, झाडाझुडपांचा पालापाचोळा खाणार्‍या मेंढ्या निकृष्ट चार्‍यामुळे अर्धपोटी राहून विविध रोगांना बळी पडत आहेत. अशिक्षित मेंढपाळ रानावनात भटकंती करताना पारंपरिक उपचाराचा अवलंब करीत आहेत. भटकंती करणार्‍या धनगर बांधवांच्या शेळ्या मेंढ्यांना जंगले खुली करून मोकळी करावी. तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यात औषध पुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तरच मेंढपाळ व्यवसाय जिवंत राहील.

मेंढ्यांपासून बरेच काही

मेंढ्यांपासून मिळणार्‍या लोकरीपासून विविध वस्तू तयार करण्यात येतात. कांबळ, ब्रश, स्वेटर, कातडी कमावणे आदी वस्तूंसोबतच दूधदुभत्याचाही व्यवसाय करता येतो. शेतीसाठी उपयुक्त लेंडीखत मिळते.