Tue, Apr 23, 2019 00:28होमपेज › Belgaon › जोल्‍लेंना आमदार करुन चूक झाली

जोल्‍लेंना आमदार करुन चूक झाली

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 11:08PMनिपाणी : प्रतिनिधी

आगामी  विधानसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर पंतप्रधान मोदी जरी निपाणीतून उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत. मग आ.जोल्‍ले यांचा टिकाव कुठे लागणार?  यासाठी आपल्यातील हेवेदावे विसरून सर्वांनी एकत्र यावे. शशिकला जोल्‍ले यांना आमदार करून आपली चूक झाली .याप्रकारची चूक भविष्यात होणार नाही, असे मत माजी आ.प्रा. सुभाष जोशी यांनी व्यक्‍त केले. हदनाळ येथे आयोजित सत्कार सभारंभात प्रा. जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आ.काकासाहेब पाटील होते. 

प्रा. जोशी म्हणाले, पंचवीस वर्षात जो विकास झाला नाही तो साडेचार वर्षात केला म्हणून सांगणार्‍या आमदारांचे निवडणुकीत पितळ आम्ही उघडे करु. हालसिद्धनाथ साखर कारखान्याने 3151 इतका उच्चांकी दर उसाला दिल्याबद्दल प्रा. जोशी यांचा केरबा पाटील , मधुकर पाटील तसेच काळम्मावाडी करार केल्याबद्दल काकासाहेब पाटील यांचा सत्कार संभाजी पाटील , पी. टी. कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

काकासाहेब पाटील म्हणाले, मागील निवडणुकीत आम्हा दोघांची चूक झाली. यापुढे ती होणार नाही.  इंग्रजाप्रमाणे व्यापार करण्याच्या उद्देशाने आलेल्या लोकांना परत पाठविण्याची जबाबदारी आता सर्वांची असल्याचा टोला त्यांनी यावेळी आ. जोल्लेंना हाणला.

यावेळी आप्पाचीवाडी ग्रुप ग्रा.पं. अध्यक्षा ज्योती कांबळे, उपाध्यक्षा संगीता पाटील, जि. पं. सदस्य जयवंत कांबळे, कोगनोळी ग्रा. पं. सदस्य मारुती कोळेकर, प्रभाकर पोकले, नेताजी पाटील, बाबुराव खोत, संदीप कांबळे, उमाजी पाटील, गणपती पाटील, बजरंग पाटील, प्रकाश कांबळे, दगडू पाटील उपस्थित होते.