Sun, Apr 21, 2019 06:23होमपेज › Belgaon › ‘एक सीमावासी, लाख सीमावासी’

‘एक सीमावासी, लाख सीमावासी’

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 21 2018 8:48PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी म. ए. समिती सज्ज झाली आहे. 31 मार्च रोजी बेळगावात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. यामुळे सीमाभागात ‘एक सीमावासी, लाख सीमावासी’चा नारा घुमणार आहे. आगामी महिनाभर सीमाभाग पुन्हा समितीच्या जागृती मोहिमेने ढवळून निघणार आहे.

मध्यवर्ती  म. ए. समितीच्यावतीने मंगळवारी आयोजित केलेल्या बैठकीत शरद पवार यांच्या सभेची माहिती देण्यात आली. यामुळे सीमाभागात चैतन्य निर्माण झाले आहे. आगामी काळात समितीतर्फे जागृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून सभा यशस्वी केली जाणार आहे.

शरद पवार आणि सीमाबांधव यांचे अनोखे नाते आहे. त्यांना सीमाप्रश्नाची जाण आहे. त्यांनी सीमालढ्यात प्रत्यक्ष भागही घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयातील कामकाजात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली म. ए. समितीची वाटचाल सुरू आहे. यामुळे त्यांच्या उपस्थितीत होणार्‍या मेळाव्याविषयी सीमाभागात उत्सुकता निर्माण झाली आहे.

सभा यशस्वी करण्याचा चंग समितीने बांधला आहे. सभेसाठी सीमाभागातून किमान एक लाख कार्यकर्ते जमविण्याचा निर्धार केला असून यासाठी सीमाभागातील प्रत्येक गाव पिंजून काढण्यात येणार आहे.
यासाठी मराठा क्रांती मूक मोर्चाच्या धर्तीवर नियोजन करण्यात येणार आहे. ‘एक मराठा, लाख मराठा’च्या धर्तीवर ‘एक सीमावासी, लाख सीमावासी’ असा नारा देण्यात आला आहे. सभेमध्ये शरद पवार सीमाबांधवांना मार्गदर्शन करणार असून हा दिवस त्यांनी  केवळ म. ए. समितीच्या कार्यक्रमासाठी राखीव ठेवला आहे. 

सभेमध्ये सीमाप्रश्नाच्या लढ्यातील जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सत्कार होणार आहे. याचबरोबर मराठी आणि समितीच्या हितासाठी म. ए. समितीसोबत राहण्याचे आवाहन मराठी भाषकांना केले जाणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी प्रत्येक रविवारी मध्यवर्ती म. ए. समिती सदस्यांची बैठक रंगुबाई भोसले पॅलेस कार्यालयामध्ये होणार आहे. येथून सभेची सूत्रे हलविली जाणार आहेत. यामुळे कार्यकर्त्यांध्ये उत्साह निर्माण झाला आहे.

सभेच्या पार्श्‍वभूमीवर छोट्या गटांना सामावून सभेची रूपरेषा तयार करण्याचे आव्हान समिती नेत्यांना पेलावे लागणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेत्याच्या सभेमुळे सीमाप्रश्न व्यापक होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा म. ए. समितीने  करून घेणे अत्यावश्यक आहे. सभेतून सीमाभागातील मराठी बांधवांमध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे.

वणवा पेटविण्याची गरज

आगामी निवडणुकीत यशासाठी राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. यासाठी सर्व पद्धतीचा अवलंब केला जात असून मराठी भाषकांना फोडण्याचे तंत्र अवलंबण्यात येत आहे. याविरोधात समितीने व्यापक प्रचार मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची अस्मिता जपण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.