Tue, Jul 23, 2019 01:59होमपेज › Belgaon › सदाशिव नगरच्या शांताराम गावकर्‍यांची कावळ्यांशी मैत्री!

पैल तो गे काऊ कोकताहे...!

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 07 2018 12:01AMबेळगाव ः प्रतिनिधी

पैल तो गे काऊ कोकताहे..
शकुन गे माये, सांगताहे..
असे ज्ञानेश्वरांनी कितीही म्हटले तरी कावळ्याचे दर्शन अशुभ मानणारे लोक आजही आहेत. घरासमोर कावळा येणे, छतावर बसणे किंवा अपशकून मानले जाते. काही पक्षी पाळले जात असले तरी त्यात कावळ्याचा समावेश नाही. पण, सदाशिवनगरातील एका व्यक्‍तीने केवळ एकच नव्हे तर अनेक कावळ्यांशी मैत्री केली आहे. 

शांताराम गावकर अस त्या व्यक्‍तीचे नाव. शांताराम रोज आपल्या दुकानासमोर कावळ्यांसाठी खाद्यपदार्थ टाकतात. ताबडतोब कावळ्यांचा थवा दाणे टिपण्यासाठी येतो. या परिसरातील दररोजचे हे चित्र असून त्या मार्गावरून जाणारे कुतूहलाने तेथे पाहात असतात.

शांताराम मूळचे कारवार जिल्ह्यातील आहेत.  सदाशिवनगरातील मुख्य रस्त्यावर त्यांचे स्वीट मार्ट आहे. दररोज सकाळी दुकान उघडल्यानंतर कावळ्यांच्या पोटाची व्यवस्था करण्याचे  काम ते आधी करतात. गेल्या सहा वर्षांपासून त्यांचा हा नित्यक्रम सुरू आहे. त्यामुळे त्यांची दुकान उघडण्याची वेळ होण्याआधीच कावळे तेथे हजर असतात आणि दुकानासमोर ‘काव, काव’ असा आवाज करत ते गावकर यांची वाट पाहात असतात.

दररोज अर्धा किलो शेव, खारेबुंदी, पापडी आणि इतर पदार्थ ते कावळ्यांसाठी राखीव ठेवतात. अंदाजे पंधरा मिनिटे कावळे तेथे खाद्यपदार्थ टिपत असतात. काही मिनिटे तेथेच थांबून थव्याने ते उडून जातात. 

त्यांच्या दुकानाशेजारी बेकरी आणि इतर दुकाने आहेत. पण, केवळ गावकर यांच्या दुकानापुढेच कावळ्यांची गर्दी असते. नियमितपणे ते खाद्यपदार्थ देत असल्याने कावळ्यांचा थवा नेमका त्याच ठिकाणी येतो. ते पाहण्यासाठी अनेकजण कुतूहलाने काही काळ तेथे थांबतात.