Thu, Jul 18, 2019 21:19होमपेज › Belgaon › शांताई वृद्धाश्रमाने रद्दीतून जमविले 20 लाख 

शांताई वृद्धाश्रमाने रद्दीतून जमविले 20 लाख 

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 10:27PMबेळगाव : प्रतिनिधी

प्रत्येकाला घराघरात साचून राहणारी रद्दी टाकाऊ वाटते. याच रद्दीच्या विक्रीतून जमा झालेली रक्कम एकत्र करून 300 हून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात बुद्धीची, ज्ञानाची पहाट फुलविण्याचे काम शांताई वृद्धाश्रमाच्या माध्यमातून सुरू आहे. दानशूर व्यक्तींनी दिलेल्या रद्दीतून तब्बल 19.20 लाख रुपये जमा करण्यात आले असून त्याचा वापर गरजू विद्याथ्यार्ंसाठी करण्यात येणार आहे.
माजी महापौर विजय मोरे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत असून याला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संयोजकांचा उत्साह दुणावत चालला आहे. यातून  विधायक कार्याची नवी पहाट होत आहे. शांताई वृद्धाश्रमातर्फे हा उपक्रम चालविण्यात येतो. यासाठी शांताई विद्या आधार संस्था सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून अंगणवाडी ते पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात येते. समाजात ज्ञानाचा उजेड पसरावा, यासाठी प्रयत्न होतो.

बेळगाव शहर परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना नेहमीच शिक्षण घेण्यासाठी पैशाची चणचण जाणवते. यातून काही वेळा शिक्षण अर्धवट राहते. परिणामी भविष्यकाळ अंधकारमय बनतो. यावर मात करण्यासाठी अशा गरजू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना आधार देण्याचे काम संस्थेतर्फे करण्यात येते. आजवर 360 हून अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे. यातून अनेक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. शिक्षणाने त्यांना परिस्थितीशी झुंज देण्याचे बळ पुरविले आहे. 

या संस्थेची सुरुवात अनपेक्षितपणे झाली. 2014 साली काही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत आवश्यक होती. यासाठी त्यांनी विजय मोरे आणि त्यांच्या सहकार्‍यांकडे धाव घेतली. यावर विचार करून रद्दीतून बुद्धीकडे हा उपक्रम हाती घेण्यात आला. घरी, कार्यालय,  शैक्षणिक संस्था, औद्योगिक कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी जमा होणारी वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके याची रद्दी संकलनास सुरूवात करण्यात आली. ती विकून यातून येणार्‍या पैशातून गरजूंना आर्थिक मदत देण्यात येते.

मागील 2 वर्षात 198 टन रद्दी जमा करण्यात आली. त्यातून 19 लाख 80 हजार रुपये जमा झाले. याचा लाभ विद्यार्थ्यांना झाला. मदत केलेले अनेक विद्यार्थी आपल्या मिळकतीतील काही हिस्सा देऊन संस्थेला मदत करत आहेत.