Mon, May 27, 2019 07:15होमपेज › Belgaon › शाहूनगर वसाहत समस्यांच्या गर्तेत

शाहूनगर वसाहत समस्यांच्या गर्तेत

Published On: Mar 04 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 11:37PMखानापूर:  राजू कुंभार

उमेदवार येती घरा तोचि  दिवाळी दसरा, अशी परिस्थिती खानापूर शहरातील राजर्षि शाहूनगर वसाहतीची झाली आहे. तुंबलेल्या-फुटलेल्या गटारी, पडकी घरे, प्लास्टिकचा निवारा असलेल्या झोपड्या, बंद पडलेली अंगणवाडी आणि प्रचंड अस्वच्छतेने पसरलेली दुर्गंधी यामुळे नगराची दुर्दशा झाली आहे. असे असताना केवळ निवडणुका जवळ येतात तेव्हाच शाहूनगरची आठवण  येते. 

नुकताच भाजपच्या काही पदाधिकार्‍यांनी या वसाहतीत रात्र घालवून या समाजाविषयी कळवळा व्यक्त केला. गेल्या कित्येक वर्षात ज्यांना दिवसा समस्या दिसल्या नाहीत त्यांनी रात्रीच्या अंधारात समस्या शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.

डोंबार वसाहतीची व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न कोणत्याही नेत्यांकडून आजवर झाला नाही. शहराची प्रामाणिकपणे स्वच्छता करणार्‍या डोंबार समाजाच्या वस्तीत मूलभूत सुविधांअभावी अस्वच्छतेचा कळस निर्माण झाला आहे. समाजाला नगरपंचायतीमध्ये दरवेळी नेतृत्व मिळते, मात्र केवळ हुद्याशिवाय शाहूनगराला कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. ही शोकांतिका आहे. तसेच अंगणवाडीअभावी येथील लहान मुले कचर्‍याच्या ढिगार्‍यावर दिवसभर खेळताना दिसतात. यामुळे येथील मुलांचा शैक्षणिक प्रश्‍नदेखील गंभीर आहे. मात्र कोणालाच शाहूनगराच्या समस्यांचे  सोयरसुतक नाही. भाजपच्या या स्टंटबाजीत केवळ दरवेळी काँग्रेसला मिळणारी मते भाजपकडे वळविण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

काही ठिकाणी घरे जमीनदोस्त झाली असल्याने प्लास्टिक तंबूचा वापर करून घरावर छत तयार  करण्यात आले आहे. काही ठिकाणी  उघड्यावरच संसार थाटला असल्याचे निदर्शनास येतेे.  अंगणवाडी इमारत आहे, मात्र शिक्षिकेअभावी  अंगणवाडीची कचराकुंडी झाली आहे. समाजाची अशिक्षितता आणि गरिबीमुळे येथील नागरिकांनी समस्यांसंदर्भात आतापर्यंत कधीही  मोठे आंदोलन हाती घेत नसल्याने लोकप्रतिनिधींचे आणि अधिकार्‍यांचे  फावले आहे.  शासनाच्या मदतीची वाट न पाहता त्यांनी आपले संसार पडक्या भिंतीच्या आडोश्याला थाटले आहेत.