Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Belgaon › दूधसागर परिसरात बंदोबस्त

दूधसागर परिसरात बंदोबस्त

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMखानापूर : प्रतिनिधी

चार दिवसांपूर्वी दूधसागर धबधब्याजवळील नाल्यात पश्‍चिम बंगालमधील युवती वाहून गेल्याची घटना घडल्यानंतर वनविभाग व पोलीस प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली आहे. विनापरवानगी जंगलात प्रवेश करुन ट्रेकिंगचे आयोजन करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गोवा वनविभाग व पोलिसांनी दिली आहे.

पुण्याहून आलेल्या ट्रेकिंग पथकाला रेल्वे पोलिसांनी धोक्याची पूर्वकल्पना दिली होती. दूधसागर धबधब्याला जोडणार्‍या नाल्यांचे प्रवाह पूर्ण क्षमतेने वाहत असून त्याठिकाणी जाणे धोकादायक असल्याचा इशारा स्थानिकांनीही  दिला होता. तरीही दुर्लक्ष करुन ट्रेकिंगसाठी आलेले 13 जणांचे पथक रविवारी दूधसागर धबधब्यानजीक गेले होते.

पथकाने सोनावळी रेल्वेस्थानकावर उतरुन आजुबाजुला काहीकाळ भटकंती केली. या परिसरात धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जंगलातील नाल्यांना धोकादायक स्वरुप आले आहे. त्याकरिता रेल्वेमार्गाने येऊन अवैधरित्या जंगलात प्रवेश करणार्‍यांवर नजर ठेवण्यासाठी वनविभागाने सोनावळी वाड्याजवळ नाका उभारला आहे. येथे कार्यरत असलेल्या वनकर्मचार्‍यांची नजर चुकविण्यासाठी या पथकाने जंगलात जाण्यासाठी एका आडवाटेची निवड केली, अशी माहिती आता समोर येत आहे. ती वाट अतिशय धोकादायक व निसरडी आहे.

नाल्याजवळ पोहोचल्यानंतर या पथकामधील चारजण नाल्याचे पात्र पार करण्याचा प्रयत्न करु लागले. दोरीच्या सहाय्याने नाल्याचे पात्र पार करताना अचानक पाण्याच्या झोताबरोबर त्यांच्यापैकी सुहागता बासू (25) ही पुण्यातील आयटी कर्मचारी युवती वाहून गेली. तर उर्वरित तिघांना स्थानिकांनी दोरीच्या सहाय्याने वेळीच बाहेर काढले. 

सुहागता हिचा नाल्याच्या पात्रात शोध घेऊनही ती आढळली नाही. दुसर्‍या दिवशी नाल्यापासून अडीच किमी अंतरावर खालच्या दरीत तिचा मृतदेह आढळून आला.

भगवान महावीर वन्यप्राणी अभयारण्याचे एक वरीष्ठ अधिकारी याबाबत माहिती देताना म्हणाले, धोकादायक ठिकाणी अप्रशिक्षित ट्रेकर्सना नेऊन वनविभागाच्या कायद्याचा भंग केल्याबद्दल पुण्यातील वैभव पिंपळेकर यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पथकासोबत पश्‍चिम घाटाची माहिती असलेली कोणीही प्रशिक्षित व्यक्ती नव्हती.

दूधसागर हा अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा परिसर पूर्णपणे अज्ञात असताना या पथकाने आपल्यासोबत स्थानिक गाईडही घेतला नव्हता. पर्यटनास बंदी घालण्यात आलेली असतानाही पर्यटकांकडून झालेली घुसखोरी आणि त्यानंतर त्याचे अपघातात झालेले पर्यवसान यामुळे रेल्वे पोलीस आणि वनविभागाने ज्याठिकाणी ट्रेकर्स उतरतात, अशा सर्व रेल्वेस्थानकांवर बंदोबस्त वाढविला आहे.