Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Belgaon › दाभोलकरांसह चौघांचे मारेकरी एकच

दाभोलकरांसह चौघांचे मारेकरी एकच

Published On: Aug 21 2018 1:31AM | Last Updated: Aug 20 2018 11:38PMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणाचा तपास कर्नाटक पोलिसांनी यशस्वी केला. त्यातूनच ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकर्‍यांची ‘लिंक’ मिळाली आणि दाभोलकरांवर गोळ्या झाडणार्‍या सचिन अंदुरेपर्यंत महाराष्ट्र एटीएस आणि सीबीआय पोहोचू शकले. या ‘लिंक’चे सर्व धागे जुळले, तर डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चौघांचे मारेकरी एकच आहेत, असा निष्कर्ष निघू शकतो. याच दिशेने सीबीआय व एटीएस यंत्रणा जोरदार तपास करीत असल्याचे सूत्रांकडून समजते.

20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी पुण्यात दाभोलकरांची हत्या झाली. हिंदू जनजागृती समितीच्या डॉ. वीरेंद्र तावडे याच्या अटकेनंतर तपास यंत्रणा मारेकर्‍यांच्या शोधात चाचपडतच राहिली. त्यानंतर काही दिवसांनी मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांना अटक झाली. त्यांच्याकडे सापडलेले पिस्तूल आणि दाभोलकर हत्येसाठी वापरले गेलेले पिस्तूल एकसारखे असल्याची थिअरी तपास यंत्रणांनी मांडली होती. मात्र, ही थिअरी सिद्ध होऊ शकली नाही. परिणामी, नागोरी-खंडेलवाल दुक्‍कल सुटले. कोल्हापुरात कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर कोल्हापूर पोलिसांनी 2015 मध्ये समीर गायकवाडला अटक केली. त्याची दाभोलकर हत्येप्रकरणीही चौकशी करण्यात आली. 2016 मध्ये डॉ. तावडेला सीबीआयने अटक केली. तावडे कोठडीत असूनही तपास मात्र पुढे काही सरकला नाही.

5 सप्टेंबर 2017 ला बंगळुरात पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली. कर्नाटक सरकारने मारेकर्‍यांचा छडा लावण्यासाठी एसआयटी स्थापन केली. या पथकाने 200 संभावित मारेकर्‍यांची यादी तयार केली. त्यात बहुतांश कट्टर हिंदुत्ववादी होते. या सर्वांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासणे सुरू झाले. त्यातून काही दिवसांत एसआयटीने हिंदू युवा सेनेचा कट्टर सदस्य के. टी. नवीनकुमारला अटक झाली. त्याच्या तपासातून गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी मारेकर्‍यांची भरती करणारा प्रवीण ऊर्फ सूचित कुमार हाती लागला. यापाठोपाठ झालेल्या दोन संशयितांच्या अटकेने मात्र तपासाला मोठी कलाटणी मिळाली. गोव्यातून अमित डेगवेकर आणि पिंपरी-चिंचवडमधून अमोल काळे यांना उचलण्यात आले. या अमोल काळेच्या अटकेनेच आता दाभोलकर हत्येचा उलगडा होऊ घातला आहे.

अमोल काळेकडे सापडलेल्या डायरीत नोंदवलेल्या हिटलिस्टमध्ये 26 नावे होती. हे सर्व जण हिंदू विरोधी विचारवंत होते. या अनुषंगाने केलेल्या तपासात कर्नाटक एसआयटीला दाभोलकर हत्येची लिंक सापडली आणि ती त्यांनी महाराष्ट्र एटीएसकडे सुपूर्द केली. त्यानुसार वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या तिघांना अटक झाली. यातील कळसकरने दाभोलकर हत्येत हात असल्याची कबुली देताच अखेरीस सचिन अंदुरेची महत्त्वपूर्ण अटक होऊ शकली.

कर्नाटक एसआयटीचे प्रमुख आयजीपी बी. के. सिंग यांनी सांगितले की, गौरी लंकेश प्रकरणाचा तपास हा आमच्यासाठी एखाद्या हत्येच्या तपासासारखा होता. मात्र, आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून या हत्येकडे पाहू लागलो. विशेषत: दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांची हत्या एकाच पद्धतीने झालेली असल्याने यात काही तरी समान धागा असू शकतो. हा निष्कर्ष समोर ठेवून तपास सुरू झाला. त्यात काही संशयास्पद संपर्क क्रमांक हाती लागले आणि ते आम्ही महाराष्ट्र एटीएसकडे दिले. त्यानंतर पुढचा तपास एटीएसने केला.

दाभोलकर मारेकर्‍यांची लिंक कर्नाटकातूनच मिळाली. त्याला दुजोरा देत दाभोलकर हत्या प्रकरणाचे सीबीआय तपास अधिकारी एस. आर. सिंग यांनी सांगितले की, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या तपास यंत्रणांमध्ये सतत माहितीची देवाण-घेवाण होत होती. कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी अटक होऊ शकले.