सौंदलगा : वार्ताहर
ग्रामीण भाग असलेल्या सौंदलगा येथून उच्च शिक्षणासाठी सोनाली शिंत्रे हिची अमेरिकेतील न्यूयॉर्क कॉलेजमध्ये एम. एस. शिक्षणासाठी निवड झाली आहे. जीआरई व टॉपिल परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याने न्यूयॉर्कमधील सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यू यॉर्कमध्ये एम. एस. कोर्ससाठी तिची निवड झाली आहे.
सोनालीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निपाणी केएलई संस्थेत झाले. दहावीमध्ये तिला 84 टक्के गुण मिळाले. वडील गंगाधर हे बस वाहक म्हणून काम करतात. त्यांनी सोनालीला पुढील शिक्षणासाठी मुडबिद्री येथे पाठविले. त्यानंतर बी. ई. शिक्षणासाठी ऑक्सफर्ड कॉलेज-बंगळूर येथे प्रवेश घेऊन कॉम्प्युटर सायन्स कोर्समध्ये तिने विशेष प्राविण्य मिळविले. यानंतर अमेरिकेमध्ये एम. एस. शिक्षण घेण्यासाठी जीआरई व टॉपिल परीक्षा दिल्या. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्याने तिची निवड झाली आहे.वडील गंगाधर व आई जयश्री शिंत्रे म्हणाल्या, एम. एस. शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत निवड झाल्याची बाब कौतुकास्पद आहे. मुलीचे आजोबा कै. मल्लाप्पा शिंत्रे यांनी येथील रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलसाठी अडीच एकर जागा देणगी म्हणून दिली आहे. शिक्षणाविषयी आपल्याला आपुलकी असून सोनालीला नेहमी प्रोत्साहन देत आहोत.