Wed, Apr 24, 2019 12:13होमपेज › Belgaon › म्हैसूरसाठी निवडा ‘नोटा’ पर्याय

म्हैसूरसाठी निवडा ‘नोटा’ पर्याय

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 8:25PMम्हैसूर : प्रतिनिधी

भाजपला मते देऊ नका. हवे तर ‘नोटा’चा पर्याय वापरा. म्हैसूर आणि चामराजनगरातील असंतुष्ट भाजप कार्यकर्त्यांनी असा उद्विग्न संदेश मतदारांना दिला आहे. भाजपच्या वरिष्ठांना धडा शिकविण्यासाठी हा खटाटोप असल्याचे बोलले जाते. बी. एस. येडियुराप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना तिकीट नाकारल्याने असा पवित्रा येडीपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅपवर झळकत असलेले भाजपविरुध्दचे संदेश पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे. रिंगणातअसलेल्यांपैकी कोणासही मत नाही चा पर्याय म्हणजेच ‘नोटा’चा पर्याय निवडून भाजपला मते देऊ नका, असे खुले आवाहन येडीपुत्र समर्थकांकडून करण्यात येत असल्याने भाजपश्रेष्ठी चिंतेत आहेत. पक्ष कार्यकर्त्यांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार असल्याचे दर्शविणारे कमळाचे उलटे चित्र असणारे पोस्टर लक्षवेधी ठरत आहे.

आपला पुत्र निवडणूक लढवित नसल्याची घोषणा येडियुराप्पा यांनी आठवड्यापूर्वी केली. तेव्हाही कार्यकर्ते नाराज तर झालेच, पण त्यांना आवरणेही अशक्य झाले होते. सिध्दरामय्या पुत्र यतिंद्र यांना जोरदार टक्कर देऊ शकणारा उमेदवार असे विजयेंद्र यांच्याकडे कार्यकर्ते पाहत होते. त्यांचा भ्रमनिरास झाला. पक्षश्रेष्ठींना या सर्व घडामोडींचा विसर पडतो ना पडतो तोच आणखी एका प्रसंगास तोंड द्यावे लागले. वरुणा मतदार संघातील गविसप्पा (36) या विजयेंद्र समर्थकाने मतदारसंघातील सरगर गावात आत्महत्या करण्यापर्यंत मजल मारली. येडियुराप्पा यांनी याची गंभीर दखल घेऊन कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारालाच मते मिळावीत असे वातावरण तयार करून वरुणातून भाजपचा उमेदवार निवडून येईल, असे वातावरण तयार करण्याचे आवाहन केले.

आपण नाराज नसून म्हैसूर तसेच चामराजनगरसाठी कार्यरत राहू, असे  विजयेंद्र यांनी जाहीर केले असले तरीही कार्यकर्ते राजी नाहीत.  वरुणा येथून भाजप उमेदवार बसवराजू यांच्यासाठी विजयेंद्र यांनी केलेल्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळाला. विजयेंद्र यांना भाजप युवा मोर्चा महासचिवपदी नियुक्तीसही बंगळूर येथे मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.‘नोटा’ चा पर्याय निवड करणार्‍यांची संख्या विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या संख्येपेक्षा अधिक असल्यास पुन्हा मतदान होईल, अशी आशा त्यांना वाटत असल्याचे बोलले जाते.