Fri, Jul 19, 2019 20:33होमपेज › Belgaon › जनावरांची दीड क्विंटल शिंगे जप्त

जनावरांची दीड क्विंटल शिंगे जप्त

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 11:39PMबेळगाव : प्रतिनिधी

माळमारुती पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सांबरा रोडवरील पोद्दार स्कूलच्या मागील बाजूस शेतवडीत जनावरांची दीड टन शिंगे जप्त करण्यात आली. एका पत्र्याच्या शेडमध्ये साठविलेल्या शिंगांमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने सदर बाब उघडकीस आली. या प्रकरणी माळ मारुती पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.

मैनुद्दीन एन. नदाफ (रा. बेळगाव) फुरखान भुरा (मंगलपुरा  हंबल, उतर प्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दोघेही फरारी झाले असून त्यांंचा शोध  घेण्यात  येत आहे. संशयितांवर भादंवि 429 कलम 9, 11, अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएसबी 1964 कायद्यानुसार 11 (1) (बी) कारवाई करण्यात आली आहे. प्राण्यांची क्रूरपणे हत्या केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

ऐन मतदानाच्या एक दिवस आधी सदर घटना उघडकीस आल्याने चर्चेला उधाण आले आहे. प्राण्यांची कत्तल करून शिंगे कुणाच्याही नजरेस पडू नयेत म्हणून ती शेतवडीत पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आली होती. मात्र, गुरुवारी सायंकाळी  सोसाट्याच्या वार्‍यासह झालेल्या पावसामुळे सदर पत्र्याचे शेड उडून गेल्यामुळे प्रकरण उघडकीस आले. पत्रे नसल्याने साठविलेल्या शिंगांची दुर्गंधी परिसरात पसरली. सकाळच्या वेळी बसवण कुडची  परिसरातील शेतकरी शेतवडीत कामासाठी गेले असताना दुर्गंधी आल्याने परिसरात पाहणी केली. 

पत्र्याच्या शेडमध्ये साठवण्यात आलेली जनावरांची शिंगे शेतकर्‍यांच्या निदर्शनास आल्याने याची माहिती माळमारुती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक चन्नकेशव टिंगरेकर यांनी घटनास्थळी  पाहणी केली. पत्र्याचे शेड मारताना या ठिकाणी फर्निचरचा अड्डा घालण्यात येणार असल्याची माहिती संबंधिताने शेतकर्‍यांना दिली होती. 

वाहन अडकले चिखलात...

उपायुक्त सीमा लाटकर यांनीही घटनास्थळी पाहणी केली. मात्र, पावसामुळे त्यांचे वाहन चिखलात अडकले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहन बाहेर काढावे लागले.