Wed, Apr 24, 2019 20:20होमपेज › Belgaon › वडापाव विक्रेत्याकडून राऊंडसह पिस्टल जप्‍त

वडापाव विक्रेत्याकडून राऊंडसह पिस्टल जप्‍त

Published On: May 25 2018 1:08AM | Last Updated: May 24 2018 11:55PMसातारा : प्रतिनिधी

शिवथर (ता. सातारा) येथील एका धाब्यावर दत्तात्रय प्रकाश जाधव (मूळ रा. मालगाव ता. सातारा सध्या रा. वाठार स्टे. ता. कोरेगाव) याच्याकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गावठी पिस्टल जप्त केले. त्याची किंमत 50 हजार रुपये असून पोलिसांनी एक राऊंडही जप्‍त केला आहे. दरम्यान, संशयित हा माजी ग्रामपंचायत सदस्य असून सध्या वडापाव विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी, दत्तात्रय जाधव याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती ‘एलसीबी’च्या पथकाला मिळाली. त्यानुसार गुरुवारी पोलिसांनी सापळा रचला व पथक तैनात केले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पिस्टल सापडले. अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे एक राऊंडही सापडला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन त्याला ताब्यात घेतले. ‘एलसीबी’ विभागात आणून चौकशी केल्यानंतर तो वाठार स्टेशन ग्रामपंचायतीचा माजी ग्रामपंचायत सदस्य असल्याचे समोर आले. सध्या मात्र वाठार येथे वडापाव विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच उत्तरप्रदेश येथील मुन्‍ना नामक व्यक्‍तीची त्याची ओळख झाली होती व त्यानेच हे घातक शस्त्र दिले असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, पोलिस सर्व बाजूने तपास करत आहेत.जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोनि पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सागर गवसने, हवालदार विलास नागे, योगेश पोळ, संतोष जाधव, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, प्रवीण कडव, गणेश कचरे, संजय पवार, ज्योतीराम बर्गे, मधुकर गुरव, मोहन नाचण, रवि वाघमारे, मारुती अडागळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.