Tue, Mar 19, 2019 05:11होमपेज › Belgaon › पटसंख्येनुसार होणार शाळांचे विलिनीकरण

पटसंख्येनुसार होणार शाळांचे विलिनीकरण

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:10PMबेळगाव : प्रतिनिधी

खासगी शाळांकडे पालकांचा  ओढा वाढला आहे. शिक्षण खाते आरटीईअंतर्गंत खासगी शाळांतून विद्यार्थ्यांना प्रवेश करत आहे. त्यामुळे सरकारी शाळांतील पटसंख्या घटली आहे. त्यामुळे शिक्षण खाते पूर्वप्राथमिक शाळेत 25 पेक्षा कमी पटसंख्या व उच्च प्राथमिक शाळेत 50 पेक्षा कमी पटसंख्या असल्यास नजीकच्या शाळांतून विलिनीकरण करणार आहे. तसेच त्या शाळांतील शिक्षकांची अधिक पटसंख्या असलेल्या शाळेत बदली करण्यात येणार आहे. 

शिक्षण खात्याने संबंधित शाळांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी शिक्षण खात्याकडे 23 जूनपूर्वी शाळांची माहिती द्यावी, असा आदेश सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे काढण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकार्‍यांना संबंधित माहिती  द्यावी लागणार आहे. सरकारी शाळांतील पटसंख्या वाढविण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम राबविले. शिक्षण खात्याने आता शिक्षकांना विद्यार्थी दाखल संख्या वाढविण्यासाठी सूचना केल्या आहते. अन्यथा बदलीसाठी तयार राहा, असा इशारा दिला आहे. सरकारी शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण खाते लाखो रूपये खर्च करत आहे. शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षणावर मोठा खर्च करीत आहे. मात्र, सरकारी शाळांतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्ययन कमी आणि अन्य कामे अधिक लावली जात आहेत. त्यामुळे शिक्षकांवरील  अन्य कामांचा तान कमी केल्यास सरकारी शाळांतील दर्जा सुधारणार आहे. 

शिक्षण खात्याने पहिलीच्या वर्गात विद्यार्थी दाखल करण्यासाठी मुदतीत वाढ केली आहे.  खासगी शाळेतील विद्यार्थी सरकारी शाळांकडे ओढण्यासाठी शाळेत विविध उपक्रम राबवा. त्यासाठी शाळा सुधारणा समिती व शिक्षकांच्या मदतीने  विद्यार्थी दाखल करण्यासाठी सुचविण्यात आले  आहे. अन्यथा कमी पटसंख्या असलेल्या शाळा नजीकच्या शाळेत विलिनीकरण करण्यात येणार आहेत. त्यासाठी नुकताच शिक्षणमंत्री एन. महेश यांनी शिक्षण खात्याच्या वरिष्ठांची बैठक घेऊन एक शिक्षकी शाळा नजीकच्या शाळेत विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव  मांडला आहे. शाळेत विद्यार्थी कमी आणि शिक्षक अधिक कार्यरत आहेत. यामुळे संबंधित शाळांतील शिक्षकांचे अन्य ठिकाणी बदली करण्यात येणार आहे.