Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Belgaon › व्हॅक्सिन डेपोतील वृक्षसंपदा वाचवा 

व्हॅक्सिन डेपोतील वृक्षसंपदा वाचवा 

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 19 2018 11:47PMबेळगाव : प्रतिनिधी

स्मार्टसिटीच्या नावाखाली व्हॅक्सिन डेपोतील सुमारे 535 वृक्ष हटविण्यात येणार आहेत. यामुळे जैवविविधतेचे समृद्ध उदाहरण असणार्‍या व्हॅक्सिन डेपोचे वैभव धोक्यात येणार आहे. परिणामी पर्यावरणवाद्यांकडून वृक्षतोडीला विरोध करण्यात येत आहे. स्मार्टसिटीसाठी वृक्षतोड आवश्यक नसून वृक्षसंवर्धनाला महत्त्व देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली आहे. 

हेरिटेज पार्क उभारणीसाठी अडथळा ठरणारी 535 वृक्ष हटविण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज 17 रोजी जिल्हा वनाधिकार्‍यांकडे  करण्यात आला आहे. ही बाब पर्यावरणवाद्यांच्या लक्षात येताच त्यांनी वृक्षतोडीला कडाडून विरोध करण्याचा निर्धार केला आहे.

व्हॅक्सिन डेपो सुमारे 100 हून अधिक एकर क्षेत्रात आहे. याठिकाणी दुर्मीळ वनस्पती व पक्षी आढळून येतात. पहाटे हजारो नागरिक या ठिकाणी फिरावयास जातात.  शहराला प्राणवायू पुरविणारा  म्हणून हा डेपो ओळखला जातो. अनेक वर्षापासून या भागात समृद्ध अशी वृक्षसंपदा आहे. 

बेळगाव परिसरात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. त्यामुळे  वृक्षारोपणाला प्राधान्य देण्याची गरज आहे. असे असताना विकासाच्या नावावर वृक्षतोड धोकादायक ठरणार आहे. स्मार्टसिटीसाठी वृक्षतोड करणे आवश्यक नाही, असे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले आहे.