Wed, Apr 24, 2019 07:51होमपेज › Belgaon › बरे झाले, नाट्य परिषद झाली सक्रिय!

बरे झाले, नाट्य परिषद झाली सक्रिय!

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 11:41PM

बुकमार्क करा

बेळगाव : सुनील आपटे

बेळगावात अ. भा. नाट्य परिषदेने 95 वे मराठी नाट्य संमेलन 2015 मध्ये भरविले होते. यामुळे मराठी रसिकांची नाट्यभूक मिटेल, दर्जेदार नाटके पाहायला मिळतील, अशी आशा जागृत झाली होती. पण गेल्या अडीच वर्षांत अपवादानेच एक-दोन दुर्मीळ कार्यक़्रम झाले. याने रसिकांची भूक भागली का, याचे उत्तर नकारार्थी येईल. आज 26 पासून परिषदेतर्फे सावगावला नाट्य महोत्सव होणार आहे. ही समाधानाची बाब असली तरी संमेलनानिमित्ताने ऐरणीवर आलेले विषय हातावेगळे करण्यात परिषदेला अपयश आले, असे म्हणावे लागेल.

अभिजात संगीत नाटकाची दक्षिणकाशी म्हणजे बेळगाव, असे समीकरण बनून गेले. महाराष्ट्रातील एकही नाटक बेळगावला सादर झाले नाही, असे कधी होत नसे. बालगंधर्वांच्या संगीत नाटकांनी येथील रसिकमनावर अधिराज्यच गाजवले. यानंतर शिलेदार कलावंतांनी ही परंपरा पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परंतु याला ग्रहण लागले ते कर्नाटकाच्या जुलमी कराचे! यामुळे महाराष्ट्रातून येथे नाटके येणे थांबले. कारण कर इतका अवाच्या सवा की नाटक मंडळींना ते खर्चिक झाले. कराच्या जंजाळातून कायमची मुक्‍ती मिळवण्यासाठी आणि कलात्मक, संगीत, प्रायोगिक नाटकांचे मंचन बेळगावात व्हावे, स्थानिक नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळून उभारी आणि इतर राज्यात संधी मिळावी, अशा उदात्त हेतूने बेळगावात संमेलन भरले. आता दोन वर्षांनंतर मागोवा घेतल्यास रसिकांच्या पदरी काय आले, हे शोधावे लागेल. 

संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज यांनी बेळगावला नाट्य पंरपरेची उज्ज्वल परंपरा असून ते माझे आवडते ठिकाण आहे, उद‍्गार काढले होते. संमेलन संपले, पण त्या काही नाटक घेऊन बेळगावात आल्या नाहीत. यामुळे येथील रसिकवेडा उपाशीच राहिला आहे. कर्नाटकातील कर कमी झालेला नाही. नाटके येत नाहीत, स्थानिक कलाकारांना अपेक्षित व्यासपीठ किंवा रंगमंच उपलब्ध झालेला नाही, येथील नाटके महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात जात नाहीत.