Sun, Aug 25, 2019 07:59होमपेज › Belgaon › सत्यशोधक विचाराची आजही नितांत गरज

सत्यशोधक विचाराची आजही नितांत गरज

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 11:33PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

म. जोतिराव फुले यांनी काळाच्या पुढचा विचार करून सत्यशोधक विचार रुजविण्याचे कार्य केले. त्या विचारधारेतून महाराष्ट्राबरोबर देशभर अनेक विचारपीठे निर्माण झाली. बेळगावात गुरुवर्य शामराव देसाई यांनी योगदान दिले. आज अंधार पसरत चालला असून उजेड दाखविणार्‍या विचाराची गरज आहे. ते केवळ सत्यशोधक विचारधारेतूनच मिळतील, असा विश्‍वास पुणे येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केला.

शामराव देसाई स्मृती प्रतिष्ठानच्यावतीने पहिला राष्ट्रवीरकार पुरस्कार डॉ. आढाव यांना कॉ. कृष्णा मेणसे यांच्या हस्ते घोंगडी, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम देऊन प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना आढाव बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉ. कृष्णा मेणसे होते.

डॉ. आढाव म्हणाले, म. फुले यांचे विचार प्रमाण मानून ठिकठिकाणी अनेक ‘स्कूल’ तयार झाली. यामध्ये शामराव देसाई यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. त्यांनी आपल्या लेखणीतून आणि समाजकार्यातून सत्यशोधक विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. . जगामध्ये एकच धर्म असल्याचे पहिल्यांदा फुल्यांनी सांगितले. परंतु त्यांच्या विचाराकडे दुर्लक्ष होत आहे. ही खरी गोष्ट आहे. त्यांचा मृत्यू 1890 मध्ये झाला.

परंतु त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित व्हायला 1970 साल उजाडावे लागले. ही त्यांच्या विचाराची उपेक्षा असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.सत्यमेव जयते पाटी लावून विचार बदलणार नाही. यासाठी मानस बदलावा लागेल. विषमता भयानक वाढत चालली आहे. समतेचा विचार मागे पडत चालला आहे. देसाइर्ंनी लक्ष्मीयात्रा बंद करून बहुजनांना नवा विचार दिला. परंतु, बेळगाव परिसरात पुन्हा यात्रा सुरू होत आहेत. हे दुर्दैव असून सत्यशोधक चळवळ पुन्हा गतिमान होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले .डॉ. मंजुश्री पवार म्हणाल्या, कष्टकरी, अज्ञानी जनतेवर होणार्‍या अन्यायावर आणि त्यांच्या अंधश्रद्धेवर  देसाई यांनी घणाघात केले. सत्यशोधक विचारांची कास धरून त्यांनी बहुजन समाजाला जागृत केले. धार्मिक गुलामगिरीविरोधात आवाज उठविला. यावेळी कॉ. कृष्णा मेणसे यांनीही मार्गदर्शन केले.

डॉ. आढाव यांच्या हस्ते शामराव देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. प्राचार्य आनंद मेणसे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रकाश मरगाळे, ए. एस. देसाई, शिवाजी देसाई उपस्थित होते. प्रा. मायाप्पा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला बेळगाव, निपाणी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.