Wed, Apr 24, 2019 19:29होमपेज › Belgaon › असंतोषाचा उद्रेक

असंतोषाचा उद्रेक

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 08 2018 12:50AMबेळगाव : प्रतिनिधी

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे आमदार सतीश जारकीहोळी नाराज असतानाच त्यांच्या समर्थकांच्या असंतोषाचा गुरुवारी, 7 जून रोजी भडका उडाला. क्‍लब रोडवरील काँग्रेसचे कार्यालय तसेच सरकारी बसेसवर त्यांनी दगडफेक केली. शिवाय, पोस्टर फाडली आणि चन्नम्मा चौकात टायरही जाळले. त्यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती निवळली. 

राज्यातील काँग्रेस-निजद युती सरकारचा बुधवारी विस्तार होऊन त्यात सतीश यांना डावलून रमेश जारकीहोळींना मंत्रिपद देण्यात आले. कुटुंबात एकालाच मंत्रिपद मिळणार असल्यामुळे आता सतीश यांची संधी हुकली. त्यामुळे नाराज समर्थकांनी रमेश जारकीहोळी बंगळूरहून बेळगावमध्ये दाखल होत असतानाच चन्नम्मा चौकात निदर्शने सुरू केली. बंगळूरमध्येही समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले.

गुरुवारी सकाळी चन्नम्मा चौकात मानव बंधुत्व संघटनेने आंदोलन छेडताना क्‍लब रोड येथील काँग्रेस कार्यालयावर दगडफेक करून पोस्टर्स फाडली. कार्यालयासमोरील फुलाच्या कुंड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यांनतर आमदार सतीश जारकीहोळी यांना मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून आंदोलन केले. तसेच टायर जाळले. या घटनेनंतर दुपारी 3.30 च्या सुमारास वाल्मिकी सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न होऊन चन्नम्मा चौकात आंदोलन केले. काही  कार्यकर्त्यांनी परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली. त्याबरोबर चौकात एकच गोंधळ उडाला. बसमधील प्रवाशांनी भीतीने जीव मुठीत धरून धूम ठोकली. या घटनेमुळे चन्नम्मा चौक परिसरातील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बराचवेळ  वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी पाहून पोलिसांनी लाठीचार्ज केला व जमावाला पांगविले. पोलिसांच्या लाठीचा प्रसाद घेतलेल्या कार्यकर्त्यांनी पळ काढला. मात्र, अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.

युवक जखमी

चन्नम्मा चौकात परिवहन मंडळाच्या बसवर करण्यात आलेल्या दगडफेकीत गोकाक येथील महांतेश बाळाप्पा तळवार (वय 28) हा जखमी झाला आहे.