होमपेज › Belgaon › सतीश जारकीहोळी राज्यसभेसाठी इच्छुक ?

सतीश जारकीहोळी राज्यसभेसाठी इच्छुक ?

Published On: Feb 09 2018 1:59AM | Last Updated: Feb 08 2018 10:35PMबेळगाव : प्रतिनिधी     

राज्यसभेच्या 4 जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होणार आहे. सत्तारूढ पक्षातील काहींचे तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पक्षाचे बलाबल पाहता काँग्रेसला 3 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. अ. भा. काँग्रेसचे सचिव आ. सतीश जारकीहोळी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवल्याचे समजते.

राज्यसभेवरील के.रेहमान   खान, एम.राजीव चंद्रशेखर, बसवराज पाटील सेडम व आर.रामकृष्ण यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपणार आहे. रेहमान खान याना पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे. नगरविकासमंत्री रोशन बेग, सलीम अहमद, नजीर अहमद व होसपेटचे अब्दुल वहाब इच्छुक आहेत.  

माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरेंद्र पाटील यांचे पुत्र कैलासनाथ पाटील, माजी मंत्री राणी सतीश, महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांची नावे लिंगायत कोट्यामधून आघाडीवर आहेत. 

आ. सतीश जारकीहोळी यानीही राज्यसभेवर जाण्याचा विचार चालविला असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्या प्रयत्नांना खो घालण्याचे काम त्यांचे बंधू सहकारमंत्री रमेश जारकीहोळी यांनी चालविले आहेत. त्यांनी आपले कनिष्ठ बंधू लखन याना राज्यसभेवर आणण्यासाठी लॉबिग चालवले आहे.  काँग्रेसकडून पहिला उमेदवार मुस्लिम समुदायाचा ठरविण्यात आल्यास लिंगायत किंवा वाल्मिकी  समुदायातील व्यक्‍ती दुसर्‍या क्रमांकाची उमेदवार असेल. तिसरा उमेदवार रिंगणात उभे करण्याचे काँग्रेसने ठरविले तर मख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे नातेवाईक चेन्नारेड्डी असतील किंवा धनवानाला आखाड्यात उभे करणात येईल, असे सांगण्यात येत आहे.