Tue, Sep 25, 2018 14:26होमपेज › Belgaon › ग्राम पंचायत पातळीवर मिळणार सॅटकॉम प्रशिक्षण

ग्राम पंचायत पातळीवर मिळणार सॅटकॉम प्रशिक्षण

Published On: Sep 10 2018 1:15AM | Last Updated: Sep 09 2018 8:49PMबेळगाव : प्रतिनिधी

गाव पातळीवर आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी सरकार तयारी करत असून याकरिता पंचायतींमधील लोकप्रतिनिधींना उपग्रहावर आधारित प्रशिक्षण (सॅटकॉम) देण्यात येणार आहे.

सध्या तालुका पंचायत कार्यालयांमध्ये उपग्रहावर आधारित प्रशिक्षण दिले जात आहे. पण, तालुक्यात दूर अंतरावर असणार्‍या ग्राम पंचायतींतील सदस्यांना प्रशिक्षणासाठी वेळेवर उपस्थित राहणे जमत नाही. शिवाय अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे ग्राम पंचायत पातळीवरच प्रशिक्षणाचा निर्णय ग्रामीण विकास आणि पंचायतराज खात्याने घेतला आहे. 

राज्यातील 6,024 ग्राम पंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना, अध्यक्ष, उपाध्यक्षांना पंचायत व्यवस्थेतील नियम आणि कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी सॅटकॉम प्रशिक्षण दिले जाते. म्हैसुरातील अद्बुल नजीरसाब ग्रामीण विकास आणि पंचायतराज संस्थेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या प्रशिक्षणावेळी नियम आणि खात्याशी संबंधित माहिती देण्याबरोबरच मंत्री, वरिष्ठ अधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंंद्वारे थेट संवाद साधता येतो. यामुळे ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान परिणामकारकपणे पोचविणे शक्य होते. सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची असते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोकप्रतिनिधी उत्साहाने प्रशासकीय कार्यात भाग घेतील, असा विश्‍वास अधिकार्‍यांना आहे.

ग्रामपंचायत पातळीवर सॅटकॉम स्थापन करण्यासाठी अद्बुल नजीरसाब संस्थेने 15.06 कोटींचा प्रस्ताव सरकारला पाठविला होता. यापैकी 7 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र स्थापन करणे, देखभाल, प्रशिक्षण देण्याची जबाबदारी अद्बुल नजीरसाब संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.