होमपेज › Belgaon › लाड ठरणार का पुन्हा लाडके?

लाड ठरणार का पुन्हा लाडके?

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 9:09PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात अल्पावधीत आपल्या नावाचा ठसा उमटविण्यात यशस्वी ठरलेले कामगारमंत्री संतोष लाड यांना कलघटगी मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागत आहे. हॅटट्रिकसाठी सज्ज असणारे लाड यांचा विजयाचा मार्ग खडतर बनला आहे. 

धारवाड जिल्ह्यातील कलघटगी मतदारसंघातून सलग दोन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर लाड यांनी विजय मिळविला. दोन्ही वेळा त्यांनी भाजप उमेदवाराला पराभूत केले. यावेळी लाड यांना स्थानिक नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. मागील निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने लाड यांनी पूर्ण केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे मतदारांचे मनपरिवर्तन करण्यासाठी लाड यांची ताकद खर्ची पडत आहे.

भाजपने यावेळी ही जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. मागील दोनवेळा पराभूत झालेले सी. एम. निंबण्णावर यांना भाजपने तिसर्‍यांदा उमेदवारी दिली आहे. 2008 मध्ये ते भाजपकडून रिंगणात होते. त्यावेळी त्यांचा 9 हजार मतांनी पराभव झाला होता. 2013 मध्ये निंबण्णावर कजपतर्फे निवडणुकीत होते. त्यावेळी त्यांचा 21 हजार मतांनी पराभव झाला. भाजपने यावेळी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. निंबण्णावर हे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे निकटचे  स्नेही मानले जातात. येडींनी त्यांच्यामागे आपली ताकद उभी केली आहे. निजदने शिवानंद अंबडगट्टी यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी निजदचा ठराविक मतदार असून त्याच्यावर निजदची  भिस्त आहे.

लाड यांचा मतदारांवर विश्वास आहे. पाच वर्षात मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर केली आहे. यामुळे एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मतदारसंघात पाण्याचा मुबलक पुरवठा आहे. विरोधकांकडून कोणत्याही अफवा पसरविण्यात येत असल्या तरी विजयाची खात्री आहे, असे लाड म्हणतात.