Wed, Apr 24, 2019 19:45होमपेज › Belgaon › कौशल्यपूर्ण रोजगारनिर्मितीवर विशेष भर : डॉ. सावंत

कौशल्यपूर्ण रोजगारनिर्मितीवर विशेष भर : डॉ. सावंत

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:45PM

बुकमार्क करा
खानापूर : प्रतिनिधी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुशल भारत कौशल्यपूर्ण भारत ही अभिनव संकल्पना साकारण्यासाठी विशेष प्रयत्न हाती घेतले आहेत. बेरोजगार तरुणांच्या हाताला काम आणि कामाला योग्य दाम देण्याच्या उद्देशाने रोजगार निर्मितीवर अधिक भर दिला जात असून ग्रामीण भागाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तरुणांनी या संधींचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन गोवा विधानसभा सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

येथील शांतिनिकेतन कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर होते. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत कौशल्याधारित प्रशिक्षण अभ्यासक्रमांतर्गत विविध दालनांचे मान्यवरांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी सावंत म्हणाले 2022 पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याच्या संकल्पाचा एक भाग म्हणून कौशल्य विकासाला महत्व दिले जात आहे. दहशतवाद व भ्रष्टाचारमुक्त भारत तसेच स्वच्छ व निर्मल भारत या संकल्पनेइतकेच महत्व कुशल भारत या योजनेलाही आहे. योजनेच्या यशस्वीतेसाठी तळागाळातील लोकांचा सहभाग महत्वाचा असल्याने याबाबत जागृती होणे आवश्यक आहे. महालक्ष्मी ग्रुपने खानापूरसारख्या ग्रामीण भागात उचललेल्या या धाडसी पावलामुळे निश्‍चितच परिवर्तन पहायला मिळणार असल्याचे सांगितले. 

विठ्ठल हलगेकर म्हणाले, तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.  खानापूरची माती आणि माणसे समर्थ आणि सामर्थ्यवान असल्याची भावना सर्वसामान्यांत निर्माण व्हावी यासाठी  हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे सांगितले.

या केंद्रात गवंडीकाम, ग्रीन हाऊस व्यवस्थापन, डेअरी फार्मिंग, मत्स्यपालन, बारबेंडर, कारपेंटर, ट्रॅक्टर ट्रेनर, जेसीबी ऑपरेटर, ट्रॅव्हल कन्सल्टंट, बिझनेस करस्पाँडंट, अड्मिनिस्ट्रेशन, कुक्कुटपालन, होम डिलीव्हरी बॉय आदी विभागांतील प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. भविष्यात पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे हलगेकर यांनी सांगितले.

प्रारंभी प. पू.. रामदास महाराज, शिवपूत्र महास्वामी, शंभूलिमग महास्वामी, चन्नबसवदेव महास्वामी, गोपाळ महाराज (हलगा) आदींच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. कार्यक्रमाला भाजपचे शंकरगौडा पाटील, विठ्ठल पाटील, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बाबुराव देसाई, धनश्री सरदेसाई, बाबाण्णा पाटील, पंडीत ओगले, चेतन मणेरीकर, चांगाप्पा निलजकर आदी उपस्थित होते. लक्ष्मण गुरव यांनी सूत्रसंचालन केले. अच्यूत पाटील यांनी आभार मानले. स्वातीकमल वाळवे यांनी स्वागत केले.