Mon, Apr 22, 2019 22:07होमपेज › Belgaon › संजय पाटील-हेब्बाळकर यांच्यात कलगीतुरा

संजय पाटील-हेब्बाळकर यांच्यात कलगीतुरा

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:13PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येणार्‍या काही भागांमध्ये कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सुरू केलेल्या कार्यक्रमावरून बेळगाव ग्रामीणचे आ. संजय पाटील व हेब्बाळकर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली असून आंदोलनालाही प्रारंभ झाला आहे. आपल्या मतदारसंघात कोणतीही पूर्वसूचना न देता सरकारी कामे सुरू करून  शिष्टाचाराचे उल्लघंन करण्यात आले आहे. त्यासाठी विधानसभेत महापालिका आयुक्‍त शशिधर कुरेर यांच्याविरोधात हक्‍कभंग प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे आ.संजय पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, बेळगाव ग्रामीणमध्ये येणार्‍या 9 विभागामधील सिद्धेश्‍वर नगर येथे रस्ताकामांचा प्रारंभ करताना गेल्या 9 वर्षांत आ. संजय पाटील  यांना विकासकामे दिसली नाहीत का? आताच ते का आंदोलन करीत आहेत, असा आरोप लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी  बेळगाव उत्तर आ. फिरोज  सेठ  व मान्यवरांच्या उपस्थितीत एकूण 9 ठिकाणी रस्ता सुधारणा गटार बांधकाम यांचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या. एकूण 100 कोटींच्या निधीतून स्मार्टसिटी योजनेतून 9 कोटी रू. खर्च करून बेळगाव ग्रामीणमधील शहरी भागात विकास कामे राबविण्यात येत असल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री निधीतून मिळालेल्या 100 कोटी रू. मधून उपलब्ध झालेला निधी हा आपला आहे. लक्ष्मी हेब्बाळकर या आमदार किंवा खासदार नाहीत. सत्तेचा दुरपयोग करून आणि आचारसंहिता डावलून ही कामे सुरू करण्यात आली  आहेत. त्यासाठी आयुक्‍त शशिधर कुरेर व इतरांच्या विरोधात हक्‍कभंगाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. यावेळी त्यांच्या समर्थकांनी महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करून जारकीहोळी, हेब्बाळकर आणि कुरेर यांचा निषेध नोंदविला. या प्रकरणाच्या विरोधात आम्ही  बसणार नसून थेट जनतेपर्यंत जाणार आहे. आयुक्‍त कुरेर हे काँग्रेसचे एजंट असल्यासारखे वागत आहेत. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

यावेळी त्यांच्या समर्थकांनी दीड तास महापालिकेला घेराव घातला. यामध्ये युवराज जाधव, प्रशांत जाधव, किरण पाटील, डॉ. विजय पाटील, मोहन पाटील, रवी कोटबागी, महेश मोहिते यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.