Sun, Nov 18, 2018 20:35होमपेज › Belgaon › मृत व्यक्‍तीच्या नावे भूखंडाची विक्री

मृत व्यक्‍तीच्या नावे भूखंडाची विक्री

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 11:55PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

एका मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे तयार करून रुक्मिणीनगर येथील मनपाचे दोन भूखंड विक्री केल्याचे प्रकरण उघडकीला आले आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त व मार्केट पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदविली आहे. परंतु पोलिसांनी अद्याप या प्रकरणाची दखल घेतलेली नाही. 

सुधीर कंग्राळकर व राजन कंग्राळकर या दोन भावांना या भूखंडांची विक्री करण्यात आल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. सुधीर कंग्राळकर यांचे 2012 मध्ये निधन झालेले आहे व भूखंड विक्री करण्यासाठी 2014 मध्ये कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. राजन कंग्राळकर हे गेल्या 20 वर्षापासून कोल्हापूर येथे वास्तव्याला आहेत. या बनावट भूखंड प्रकरणाची त्यांच्या कुटुंबाला कल्पनासुद्ध नव्हती. परंतु येथील न्यायालयाने त्यांना समन्स बजाविल्याने हे बेकायदा भूखंड प्रकरण उघडकीला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश पोलिस महानिरीक्षकांनी मार्केट पोलिस स्थानकाला बजाविला आहे. रुक्मिणीनगर येथील रुक्मिणी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे स्थापना 1975 मध्ये करण्यात आली होती. या वसाहतीमधील प्लॉट नं. 29, 30 हे मनपाच्या मालकीचे असून त्या दोन्ही प्लॉटची बनावट कागदपत्राद्वारेा विक्री केल्याचे चौकशीअंती उघड झालेले आहे. त्या भूखंडांच्या कागदपत्रावर सुधीर व राजन यांच्या नावाने बनावट सह्या केलेल्या आहेत.

विक्री केल्यानंतर ते दोन्ही भूखंड त्यांच्या नावाने सीटीएसमध्ये नोंद करण्यात आले आहेत. त्यानंतर बनावट वटमुखत्यार पत्राद्वारे ते दोन्ही भूखंड एका संस्थेला विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर संस्थेकडून अगाऊ 35 लाख रु. घेण्यात आले होते. दोन्ही भूखंडांवर एका पतसंस्थेतून कर्जही काढण्यात आले आहे. अगाऊ पैसे दिलेल्या संस्थेला भूखंड देण्यास टाळाटाळ केल्याने सदर संस्थेने न्यायालयात खटला दाखल केला आहे. त्यानुसार कंग्राळकर बंधूंना न्यायालयाने समन्स बजाविल्यानंतर  या बोगस भूखंड प्रकरणाची कल्पना आली. याप्रकरणी कंग्राळकर यांच्यावतीने न्यायालयामध्ये सुधीर यांचा मृत्यू दाखला व राजन यांच्या सह्यांचे नमुनेही सादर केले आहेत. सदर प्रकरण कोणी केले. त्याची माहितीही कंग्राळकर यांनी पोलिसांना दिली आहे. परंतु अद्याप या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केलेला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.