Fri, May 24, 2019 08:27होमपेज › Belgaon › डॉ. कलबुर्गी हत्याप्रकरण तपास एसआयटीकडे?

डॉ. कलबुर्गी हत्याप्रकरण तपास एसआयटीकडे?

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 11:00PMबेळगाव : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार  गौरी लंकेश मारेकर्‍यांच्या तपासासाठी एसआयटीने चालविलेल्या सखोल चौकशीप्रमाणे ज्येष्ठ विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडून झालेला नाही, असा सूर आता निघत आहे. डॉ.कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेण्यात पोलिसांनी यश येत नसल्याने शोधकार्य एसआयटी किंवा अन्य कोणत्याही प्रबळ संस्थेकडे सोपविण्यात यावे, अशी मागणी आता विचारवंत व कलबुर्गी कुटुंबियांकडून होत आहे.

डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येला 30 ऑगस्टला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. मारेकर्‍यांचा सुगावा अद्याप लागलेला नाही. मात्र गौरी लंकेश यांची हत्या घटनेनंतर  9 महिन्यात मारेकर्‍यांना एसआयटीने शोध घेऊन न्यायालयाला दोषारोपत्र सादर केले आहे. 

डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर तत्कालीन सरकारने तपासाची जबाबदारी सीआडीकडे सोपविली होती. पोलिस अधिकार्‍यांनी तपासकार्याला सुरुवात केल्यानंतर काही जणांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या. तत्कालीन गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी मारेकर्‍यांचा सुगावा लागला असून त्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील, असे  साहित्यिकांच्या शिष्टमंडळापुढे म्हटले होते. मात्र अद्याप मारेकरी कोण, हे स्पष्ट झालेले नाही.

डॉ. कलबुर्गी हत्याप्रकरणाचा तपासात प्रगती आहे, या व्यतिरिक्त अन्य कोणतीही माहिती सीआयडी अधिकार्‍यांकडून मिळत नाही. कलबुर्गी कुटुंबियांना कोणत्याही अधिकार्‍यांकडून तपासाबाबत माहिती देण्यात आलेली नाही किंवा तपासासाठी गेल्या वर्षभरात एकही अधिकारी धारवाडकडे फिरकलेला  नाही.  

तपास एसआयटीकडे सोपवा

दरम्यान, डॉ. कलबुर्गी, पानसरे, दाबोलकर हत्याविरोधी संघर्ष समिती व काही समविचारी संघटनांनी गौरी लंकेश प्रकरणात एसआयटीच्या कार्याची प्रशंसा केली आहे. त्यामुळे आता बी. के. सिंग नेतृत्वातील याच एसआयटीकडे कलबुर्गी हत्याप्रकरणाची जबाबदारी सोपवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. येत्या काहीच दिवसांत सीआयडी व एसआयटी विभागातील अधिकार्‍यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले आहे.

एसआयटीकडे तपास सोपविणार 

डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकर्‍यांचा तपास न लागणे ही राज्य सरकारलाही डोकेदुखी बनली आहे. दरम्यान, उमादेवी कलबुर्गी यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेवर विचारविनियम करून न्यायालयाने जारी केलेल्या नोटिसीला केंद्र सरकारने उत्तर दिले आहे. डॉ.कलबुर्गी हत्याप्रकारणाचा तपास एनआयएमार्फत करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे न्यायालयाने सूचविले आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात चौकशीला सुरुवात होण्याची शक्यता असून तत्पूर्वी राज्य सरकार हे प्रकरण एसआयटीकडे सोपविण्याची शक्यता असल्याचे राज्याच्या गृहखात्याने म्हटले आहे.