Sun, May 19, 2019 11:57
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › महाराष्ट्रातील संशयितांच्या ताब्यासाठी एसआयटी उत्सुक

महाराष्ट्रातील संशयितांच्या ताब्यासाठी एसआयटी उत्सुक

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:31PMबंगळूर : प्रतिनिधी

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश हत्येमध्ये साम्य असून संशयित एकाच संघटनेतील असल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला आहे. यामुळे गौरी हत्ये प्रकरणी कर्नाटक विशेष तपास पथकाने (एसआयटी) महाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.

महाराष्ट्रातील दहशतवादविरोधी पथक व सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आदींना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रे व इतर साहित्य जप्त केले. त्यांची चौकशी केल्यानंतर गौरी लंकेश हत्येशी त्यांचा संबंध असल्याची माहिती उघडकीस आली. लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला मास्टरमाईंड अमोल काळे याच्याकडे सापडलेल्या डायरीत अनेकांची नावे होती. काहींच्या घरचा पत्ता, संपर्क क्रमांक त्यामध्ये होते. त्यानुसार विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. 

महाराष्ट्रात अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून गौरी हत्येप्रकरणी अधिक माहिती मिळविण्यासाठी कर्नाटक एसआयटी प्रयत्न करत आहे. संशयितांना सीबीआय कोठडी मिळाली आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाची रितसर परवानगी घ्यावी लागणार आहे. या प्रक्रियेसाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यार्पंयत एसआयटीकडून संशयितांची चौकशी शक्य आहे.

ऑगस्टमध्येच करायची होती हत्या

गौरी लंकेश हत्येचा कट आखण्यात आल्यानंतर त्यासाठी संशयितांनी बेळगावातील संशयित भरत कुरणे याच्या शेतात पिस्तूल चालविण्याचा सराव सुरू केला. याच काळात हुबळीतील संशयित गणेश मिस्कीन याच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे तो काही दिवस सरावात भाग घेऊ शकला नाही. या कटातील मास्टरमाईंड असणार्‍या अमोल काळेच्या नियोजनानुसार गणेश मिस्कीनच्या जागी इतराला नियुक्त करणे शक्य झाले नाही. 

परशुराम वाघमारे, भरत कुरणे, अमित बद्दी आणि आणखी दोघांवर हत्येची जबाबदारी सोपविण्यात आली होती. गोळी झाडणार्‍याला मोटारसायकलीवरून गौरी यांच्या घरापर्यंत नेण्याची सूचना गणेशला करण्यात आली होती. त्याच्या जागी इतर व्यक्तीवर ती जबाबदारी सोपविण्यास काळेने नकार दिला. त्यामुळे गतवर्षी ऑगस्ट महिन्यातच गौरी यांच्या हत्येसाठी सर्व तयारी करण्यात आली तरी मिस्कीनच्या वडिलांच्या निधनामुळे महिनाभर कट पुढे ढकलण्यात आला.  गौरी यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी झाली होती.