Sat, Jul 20, 2019 21:38होमपेज › Belgaon › ‘एसआयटी’कडून दादा वेदांत याचा शोध सुरू

‘एसआयटी’कडून दादा वेदांत याचा शोध सुरू

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 15 2018 12:22AMबंगळूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील अंतिम सूत्रांपर्यंत पोहोचल्याचा दावा विशेष तपास पथकाने (एसआयटी) केला असून, आता सुजित ऊर्फ दादा वेदांत याचा आता शोध घेतला जात आहे. त्यानेच परशुराम वाघमारेसह काही जणांना बेळगाव, गोवा आणि सातार्‍यात शस्त्रप्रशिक्षण दिले होते, असेही तपास अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

गौरी हत्या प्रकरणातील एक संशयित अमोल काळेचा मित्र  असलेला सुजित हा हिंदू मेळाव्यामध्ये भाग घेत होता. मेळाव्यात तो युवकांचे मोबाईलचे क्रमांक मिळवून त्यांच्याशी जणू आपला पूर्वीपासून परिचय असल्यासारखे संभाषणस करून हिंदू धर्माच्या विरोधात लिखाण करणार्‍यांविरुद्ध प्रक्षोभित करायचा, असेही ‘एसआयटी’चे म्हणणे आहे. ही माहिती 10 हजार युवकांच्या मोबाईल तपासणीवरून ‘एसआयटी’ने काढली आहे. आता आणखी काही युवकांचा सहभाग चौकशीनंतर उघड होणार आहे. हत्यांसाठी प्रक्षोभित करणार्‍याला दादा वेदांत या नावाने ओळखले जायचे, असे विशेष तपास पथकाच्या एका ज्येष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

शस्त्रप्रशिक्षण देण्याचे कामही दादाकडूनच केले जात होते. त्याच्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या युवकांचे संघटनही केले जात होते. त्या युवकांना सातारा, गोवा, महाराष्ट्र व बेळगाव जिल्ह्यातील निर्जन भागामध्ये एअरगनद्वारे प्रशिक्षण देण्यात येत होते. त्या प्रशिक्षणातून पक्का शार्पशूटर, कोण आहे? हे दादा ओळखत होता. तशा 100 प्रशिक्षित युवकांची ओळख अमोल काळेला करून देण्यात आली होती. त्यासंदर्भात आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे. त्या 100 युवकांपैकी गौरी लंकेशवर गोळ्या घातलेल्यापैकी परशुराम वाघमारे हा एक युवक असल्याचे तपास पथकाने स्पष्ट केले आहे.

अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या चौकशीत होट्टी मंजू, गिरीश कर्नाड, भगवान, ललिता नायक, विनय कुलकर्णी, एम. बी. पाटील यांच्यासह आणखी काही मान्यवरांच्या हत्या करण्याची योजना आखण्यात आली होती, असे उघड झाले आहे.

वेदांत महाराष्ट्रात?

अमोल काळेने दिलेल्या माहितीनुसार दादा वेदांत महाराष्ट्रामध्येच असल्याची माहिती मिळालेली आहे. 2013 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येमध्ये त्यांचा  सहभाग आहे का? हा तपासही केला जात आहे. दाभोळकर हत्येशी संबंधित डॉ. वीरेंद्र तावडेला विशेष तपास पथकाने अटक केली होती. धारवाडमधील विचारवंत एम. एम. कुलबुर्गी यांच्या हत्येत अमोल काळेचा सहभाग असल्याचा संशय पोलिस अधिकार्‍यांना आहे.