होमपेज › Belgaon › ऊस बिले द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव

ऊस बिले द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:06AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

यावर्षीचा ऊसगाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले. मात्र जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने उसाचे बिल उत्पादकांना दिलेले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ही बिले त्वरित अदा करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी साखर कारखान्यांना बजावावेत, अन्यथा मंगळवारी मुख्यमंत्र्यांना घेराव घालू, असा इशारा रयत संघटनेने दिला. रयत संघटना आणि हरित सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील ऊस उत्पादक उपस्थित होते.

यावर्षी पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती आहे. यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर केला. दुसरीकडे कारखान्यांनी उसाची बिले थकविली आहेत. परिणामी शेतकर्‍यांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांच्या समस्येत भर पडली आहे.

सरकारने दर अद्याप निश्‍चित केलेला नाही. खासगी मालकीच्या कारखानदारांकडून उत्पादकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने प्रतिटन उसाला 3150 रु. इतका दर देणे भाग पाडावे, अशी मागणी आहे.

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या मालकीच्या सौभाग्यलक्ष्मी कारखान्याकडेही ऊस थकबाकी आहे. त्यांच्याकडून शेतकर्‍यांची थकबाकी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशीही मागणी केली. 

उपरोक्‍त मागण्यांची पूर्तता न झाल्यास जिल्ह्याच्या दौर्‍यावर येणार्‍या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना घेराव घालण्यात येईल, असा इशाराही  देण्यात आला. यावेळी राघवेंद्र नाईक, अशोक यमकनमर्डी, चिनाप्पा पुजारी व शेतकरी उपस्थित होते.