Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Belgaon › वर्षापर्यटनाला पळा, पण जीव सांभाळा !

वर्षापर्यटनाला पळा, पण जीव सांभाळा !

Published On: Jun 13 2018 1:32AM | Last Updated: Jun 12 2018 9:49PMखानापूर : वासुदेव चौगुले

मान्सूनच्या पहिल्या पावसाबरोबरच खानापूर आणि बेळगाव परिसरातील पर्यटकांना चोर्ला आणि आंबोली घाटातील वर्षापर्यटनाचे वेध लागले आहेत. मात्र तरुणाईच्या अतिहुल्लडपणामुळे अनेकवेळा वर्षापर्यटनाच्या उत्साहाचा बेरंग होतो. त्यामुळे पुरेशी खबरदारी, धोकादायक ठिकाणी सेल्फीचा मोह टाळणे आणि अतिधाडस न करणे  यासारख्या प्रतिबंधक गोष्टींचे सक्तीने पालन केल्यास वर्षापर्यटनाचा आनंद सुरक्षितपणे लुटता येईल.

 जागोजागी फेसाळत कोसळणारे धबधबे, दाट धुक्याची चादर पांघरलेला निसर्ग आणि रिमझिम पावसातील भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले आता पश्‍चिम घाटाकडे वळू लागली आहेत. कणकुंबीच्या आजूबाजूच्या परिसरात पारवाड, चिगुळे, चिखले, सुरल परिसरात लहान  धबधबे आहेत. जुलैमध्ये जोराच्या पावसामुळे याठिकाणी पायी चालत जावे लागते. त्याकरिता अनेक पर्यटक जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात कुटुंबासह पश्‍चिम घाटाची सफर करण्याला प्राधान्य देतात.

तालुक्याच्या अन्य भागात पावसाचा जोर ओसरला असला तरी कणकुंबी आणि चोर्ला घाटात संततधार सुरुच आहे. धबधब्यांच्या ठिकाणी बर्‍याचवेळा काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात जीव धोक्यात घालण्याचे प्रकार तरुणाईकडून केले जातात. विशेषकरुन कॉलेजच्या तरुण-तरुणींच्या ग्रुप सहलीदरम्यान असे प्रकार घडतात.

फेसबुकवरील आपल्या धाडसी फोटोला सर्वाुधक लाईक्स मिळावेत, या भावनेने फोटोसाठी नको ते धाडस करण्याची दुर्बद्धी अशावेळी वाईट प्रसंगाना कारणीभूत ठरते.