Mon, Aug 19, 2019 11:08होमपेज › Belgaon › शेतातील विहिरीत सापडले हजारो रॉकेट

शेतातील विहिरीत सापडले हजारो रॉकेट

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:13PMबंगळूर : प्रतिनिधी

टिपू सुलतानच्या काळातील वापरण्यात येणारे सुमारे हजारो रॉकेट शिमोगामधील बिदनूर येथील शेतातील विहिरीत सापडले आहेत. 

नागराज राव यांच्या मालकीच्या शेतामध्ये पुरातत्त्व खात्याकडून उत्खनन सुरू असताना रॉकेट सापडले. अठराव्या शतकात टिपू सुलतानने पहिल्यांदा रॉकेट बनविले होते. पण, त्याच्या काळातील हे रॉकेट असल्याबाबतचे संशोधन करावयाचे आहे. विहिरीमध्ये हे रॉकेट टाकण्याचे कारण शोधले जाणार असल्याची माहिती पुरातत्त्व खात्याचे साहाय्यक संचालक आर. शेजेश्‍वर यांनी सांगितले.

2002 मध्ये नागराज यांनी आपल्या शेतात खड्डा खणताना असेच विहिरीतील गाळ काढताना त्यामध्ये 160 रॉकेट सापडले होते. शिवाय काही लोखंडी वस्तूही सापडल्या होत्या. त्यांनी याबाबत पुरातत्त्व खात्याला कळविले होते. 2007 मध्ये रॉकेवटर संशोधन करण्यात आले होते. 

त्या जमिनीत आणखी रॉकेट असल्याचा संशय व्यक्‍त करण्यात आला होता. त्यानुसार 25 आणि 26 जुलै रोजी उत्खनन सुरू करण्यात आले. आणखी 100 ते 200 रॉकेट सापडतील असा अंदाज पुरातत्त्वच्या अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला होता. मात्र, सुमारे हजार रॉकेट सापडले आहेत. 

सापडलेल्या रॉकेटवर संशोधन करण्यात येणार आहे. शिमोग्यातील सरकारी वस्तू संग्रहालयात ते ठेवण्यात येतील. पाच ते सहा आकारांमधील रॉकेट कुणी बनविले, त्याचा वापर आणि इतर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संशोधनामुळे हैदरअली आणि टिपू सुलतानच्या काळात केळदी गाव आणि म्हैसूर यांच्यातील संबंधांवरही प्रकाशझोप पाडला जाईल.

टिपू सुलतानच्या काळात प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रॉकेट बनविण्यात आले. त्या काळचे रॉकेट केवळ दोनच ठिकाणी पाहता येतात. बंगळूर आणि इंग्लंडमधील वस्तू संग्रहालयात रॉकेट ठेवण्यात आले आहेत. येथूनच इंग्लंडला रॉकेट नेण्यात आले आहेत.