Fri, Apr 26, 2019 17:25होमपेज › Belgaon › दंगलग्रस्त भागात घराघरांची झडती

दंगलग्रस्त भागात घराघरांची झडती

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 12:31AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

दंगलग्रस्त खडक गल्ली परिसरातील प्रत्येक घराची पोलिसांनी बुधवारी झडती घेऊन अनेक घरांतून बाटल्या, दगड, विटा आणि फरशांचे तुकडे जप्‍त केले.  पोलिसांनी अचानकपणे सुरू केलेल्या कारवाईनंतर संवेदनशील भागात एकच खळबळ उडाली.

सोमवारी रात्री दंगलीदरम्यान दंगलखोरांनी दगड विटा आणि फरशांचा तुफानी मारा केला होता.  पेट्रोल बॉम्बचाही वापर केला होता. अचानकपणे समाजकंटकांकडे हे साहित्य आलेच कुठून, असा प्रश्‍न पोलिसांना पडला होता. त्यामुळे उत्तर विभाग पोलिस महासंचालक रामचंद्रराव यांनी मंगळवारी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसमवेत चर्चा केली.

त्यानंतर बुधवारी सायंकाळी पोलिस उपायुक्‍त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिस प्रशासनाने खडक गल्ली, भडकल गल्ली, जालगार गल्ली, चांदू गल्ली येथील घराघरांत जाऊन झडतीसत्र सुरू केले. सशस्त्र पोलिस बंदोबस्तासह संवेदनशील भागात झडतीसत्र सुरू झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. काही ठिकाणी व्यावसायिकांनी आपले व्यवहारही बंद केले. संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त वाढल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या भागातील रस्त्यावरील वाहतूकही मंदावली.

पोलिसांनी घरातील प्रत्येक खोलीबरोबरच स्नाहगृह, स्वच्छतागृह तसेच घराच्या माळ्यावर जाऊन साहित्य मिळते का, याची पाहणी केली. काही ठिकाणी गच्चीवर कपडे आणि अन्य साहित्यासाठी वापरण्यात येणार्‍या विटाही पोलिसांनी कारवाईदरम्यान जप्त केल्या. 

काही ठिकाणी काही युवकांनी झडतीदरम्यान पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी खाकीचा धाक दाखविताच त्यांना नमते घ्यावे लागले. काही ठिकाणी महिला आणि पोलिसांशी शाब्दिक चकमकी घडल्या.