Mon, Apr 22, 2019 11:41होमपेज › Belgaon › रिंगरोड लाभदायक, पण शेतकर्‍यांना तापदायक

रिंगरोड लाभदायक, पण शेतकर्‍यांना तापदायक

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 12 2018 11:00PMबेळगाव : प्रतिनिधी

शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने शहर विकास प्राधिकाराकडून (बुडा) 1995 पासून रिंगरोडासाठी प्रयत्न केला जात आहे. बुडाकडून दोन वेळा रिंगरोडाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला होता. मात्र वेगवेगळ्या कारणांनी सरकारने हा प्रस्ताव रद्द केला होता. मात्र केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी ‘भारत माला’ या महामार्ग  विकास योजनेंतर्गत रिंगरोडाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

उत्तर कर्नाटकातील महत्वाचे शहर व आंतरराज्य वाहतुकीचे महत्वाचे केंद्र असलेल्या बेळगाव शहरात वाहतुकीची मोठी समस्या आहे. भविष्यातील दृष्टीकोन ठेवून बुडाकडून रिंगरोडचा प्रस्ताव राज्य सरकारकडे देण्यात आला होता. 1995 पासून बुडाने रिंगरोडसाठी प्रयत्न चालविले आहेत. दोनवेळा सर्व्हेक्षणही करण्यात आले होते. खासगी कंपनीच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करून सरकारकडे देण्यात आले असला तरी राज्य सरकारने निधीचे कारण सांगून या प्रस्तावाला नकार दर्शविला होता. 

Tags :Ringerroads, beneficial, farmers , annoying

रिंगरोड करण्यास राजकीय इच्छाशक्तीचा अभावही तितकाच कारणीभूत होता. कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून यासाठी पाठपुरावा केला नसल्याचेही पुढे आले आहे. 
बेळगाव शहर हे औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, साखर उद्योग, कृषी आदीसाठी प्रसिध्द आहे. याबरोबरच महत्वाच्या शहरांसाठी आंतरराज्य वाहतुकीची महत्वाचे केंद्र आहे. यामुळे वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे. शहरात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नेहमीच दुर्घटना घडत आहेत. तर वाहतूक कोंडीलाही कारणीभूत ठरत आहे. वाहतुकीचा होणारा ताण कमी करण्यासाठी रिंगरोडचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. केंद्र सरकारने या रस्त्याला भारत माला योजनेंतर्गत मान्यता दिली आहे. 

विविध प्रकल्पांसाठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी संपादित करण्यात येत आहे. यामुळे देशोधडीला जाण्याची शक्यता आहे. नियोजित रिंगरोडसाठी मोठ्याप्रमाणत शेकडो एकर शेतजमीन  संपादित करण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांकडून विरोध होणार हे निश्‍चित आहे. मात्र भूसंपादनापासून शेतकरी अद्याप अनभिज्ञ आहेत. भविष्यामध्ये शेतजमिनीसाठी शेतकरी संघटना मोठे आंदोलन उभारण्याची शक्यता आहे.शहरवासियांसाठी लाभदायक ठरणारा रिंगरोड शेतकर्‍यांसाठी मात्र बेकारीची कुर्‍हाड ठरणार आहे.  या योजनेतीलच भाग असलेल्या मच्छे ते हलगा बायपास या रस्त्यालाही शेतकर्‍यांनी आपला विरोध कायम ठेवला आहे.  यामुळे आगामी नियोजित प्रकल्पाबाबत इतर भागातील शेतकरी  कोणती भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे.