Wed, Aug 21, 2019 14:53



होमपेज › Belgaon › अवजड वाहतुकीला ‘रिंगरोड’ पर्याय

अवजड वाहतुकीला ‘रिंगरोड’ पर्याय

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 9:35PM



बेळगाव : प्रतिनिधी     

 शहरात अवजड वाहतुकीच्या वेगावर व वेळेवर कोणतेच निबर्र्ंध नाही. अवजड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी आरटीओ सर्कल येथे अवजड वाहनाने एकाचा बळी घेतल्यानंतर शहराच्या रिंगरोडचा मुद्दा चर्चेत आला आहे. शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आल्यानंतर यामध्ये वाहतूक नियंत्रणाला प्राधान्य देण्यात आल आहे. याबाबत अद्याप  कोणतीच ठोस कृती हाती घेण्यात आली नसल्याने शहरातून वाहतूक  करणार्‍या अवजड वाहनांवर निर्बंधाची मागणी जोर धरू लागली आहे.  यावर प्रशासन विचार करणार का, असा प्रश्‍न शहरवासीयांतून उपस्थित केला जात आहे. 

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अनेक बळी गेले आहेत. याची दखल घेऊन बेळगावचे  तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील व तत्कालीन जिल्हाधिकारी एन. जयराम  यांनी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर वेळेचे निर्बंध घातले होते. मात्र काही काळानंतर पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी रिंगरोडचा पर्याय हाच उपाय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

शहर विकास प्राधिकरणाकडून रिंगरोडसाठी राज्य सरकारकडे दोन वेळा प्रस्ताव पाठविला होता. निधीअभावी राज्य सरकारने सदर प्रस्तावाला असमर्थता दर्शविली  आहे. यामुळे नियोजित रिंगरोडचा प्रकल्प रखडला आहे. हलगा ते पिरनवाडी बायपास रस्ता या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारच्या योजनेलाही खीळ बसली आहे. शेतकर्‍यांनी जमिनी देण्यास विरोध दर्शविल्याने हा प्रकल्प रखडला आहे. यामुळे शहराच्या अवजड वाहतूक नियंत्रण योजनेचे भिजत घोंगडे आहे. नुकताच केंद्र सरकारने  भारतमाला परियोजनेंतर्गत बेळगाव शहराला रिंगरोड मंजूर केला आहे. केंद्र सरकारने 6.92 लाख कोटी रु. निधीअंतर्गत देशामध्ये अनेक महानगरांसाठी उपयोगी ठरणारे रिंगरोड बनविण्याची योजना आखली आहे. या निधीतून 83,677  कि. मी. चौपदरी रस्ता बनविण्यात  येणार आहे. यामधून बेळगावला रिंगरोड मंजूर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाचा येत्या डिसेंबरात  प्रारंभकरण्याचे नियोजन आहे. त्या माध्यमातूनच शहरात रिंगरोड होण्याची शक्यता वर्तविली जाते. आरटीओ सर्कल येथे झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर या चौैकातील रहदारीच्या समस्या तीव्रतेने समोर आल्या आहेत. सुसाट येणार्‍या वाहनांना नियंत्रण ठेवणारे गतिरोधक, सिग्नल, वाहतूक पोलिस यांची व्यवस्था नसल्याने हा चौक मृत्यूचा  सापळा बनला आहे. यासाठी शहरातील अवजड वाहतुकीवर वेळेचे निर्बंध घालावेत, अशी मागणी केली जात आहे.