Wed, Jan 23, 2019 13:20होमपेज › Belgaon › ‘अन्नभाग्य’चा तांदूळ जप्त

‘अन्नभाग्य’चा तांदूळ जप्त

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 04 2018 11:24PMबेळगाव : प्रतिनिधी

अन्नभाग्य योजनेतील 54 क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी नेण्यात येत असताना पोलिसांनी तो पकडला. त्याची किंमत 81 हजार रु. आहे. पोलिसांनी दोन वाहनेही जप्त केली आहेत. तांदळाच्या काळ्या बाजाराबद्दल हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रकिफ बाबूसाब तिगडी (वय 30, रा. हिरेबागेवाडी), उळवेश बसप्पा हळेउरू (22,  रा. बैलहोगल), प्रवीण ऊर्फ मंजू बसवराज पावटे (बैलहोंगल)  यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेंतर्गत वितरित कण्यात येणार्‍या तांदळाची 10 रुपयाने खरेदी करून त्याची काळ्या बाजारात विक्री करण्यात येत असल्याची खात्रीलायक माहिती हिरेबागेवाडी पोलिसांना मिळाली होती. यावरून बैलहोंगल येथून हिरेबागेवाडीमार्गे बेळगावला दोन बोलेरो वाहनांतून तांदूळ आणला जात होता. तो 56 पोत्यांमध्ये भरण्यात आला होता. पोलिसांनी सापळा रचून तो पकडला, तसेच दोन्ही वाहने जप्त केली आहेत. सदर तांदूळ 10 रुपयाने खरेदी करून त्याची बेळगावात 15 रुपयाने विक्री केली जाणार होती. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. बेळगाव ग्रामीण एसीपी, हिरेबागेवाडी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक, आहार निरीक्षक आदी अधिकार्‍यांनी या कारवाईत भाग घेतला.