Sun, May 26, 2019 12:37होमपेज › Belgaon › कर्नाटकात गोंधळ, दिल्‍लीत उतारा

कर्नाटकात गोंधळ, दिल्‍लीत उतारा

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 10 2018 12:08AMनवी दिल्ली/  बंगळूर : वृत्तसंस्था

कर्नाटकातील असंतुष्ट आमदारांचा गोंधळ शांत करण्यासाठी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन निष्क्रिय मंत्र्यांना हटवण्याचा उतारा काँग्रेसने योजला आहे. दर सहा महिन्यांनी प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल आणि निष्क्रिय मंत्र्यांना हटवून त्याजागी असंतुष्ट नेत्यांना स्थान दिले जाईल. तसेच दोन वर्षांनी पूर्ण मंत्रिमंडळ बदलले जाईल.शनिवारी नवी दिल्लीत कँाग्रेस अध्यक्ष राहुल गांधींशी वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाल्यानंतर हा तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

शनिवारी असंतुष्ट आमदारांचे नेते आणि ज्येष्ठ आमदार एम. बी. पाटील यांनीही राहुल यांची भेट घेतली. पाटील यांनी उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. ते न मिळाल्यास 20 आमदारांना घेऊन त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राहुल यांनी शुक्रवारी रात्री माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर, ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिनेश गुंडुराव यांना पाटील यांची मनधरणी करण्याची सूचना केली होती.

तथापि, पाटील उपमुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहेत. दोन उपमुख्यमंत्री असण्यात अडचण काय, असा त्यांचा प्रश्न आहे. त्याबरोबरच सतीश जारकीहोळी, एच. के. पाटील हे नेतेही नाराज आहेत.ही नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेसने मंत्रिपदे फिरती ठेवण्याचा तोडगा काढला आहे. त्यानुसार दर सहा महिन्यांनी मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. निष्क्रिय मंत्र्यांना तत्काळ हटवले जाईल. शिवाय कामगिरी चांगली असली तरी दोन वर्षांनंतर सार्‍याच मंत्र्यांना बाजूला करून त्या जागी नव्या चेहर्‍यांना संधी द्यावी, असेही ठरवण्यात आले आहे.

हा तोडगा ‘कामसू’ मंत्र्यांना पटेल की नाही, हे आताच सांगता येणार नाही. मात्र काँग्रेसमध्ये फूट पडू नये, यासाठी हा तोडगा चपखल असेल, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. 
काँग्रेसचे असंतुष्ट नेते बाहेर पडले तर काँग्रेस-निजद सरकारच अस्थिर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनीही स्वतः एम. बी. पाटील यांच्या बंगळूरमधील निवासस्थानी भेट घेऊन सबुरी धरण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, मंत्रिमंडळात अजूनही सात जागा रिक्त असून, त्यापैकी सहा जागा काँग्रेसला मिळणार आहेत. या जागांवर असंतुष्ट नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 

एम.बी.पाटलांना मंत्रिपद मिळणार 

दुसर्‍या टप्प्यात होणार्‍या मंत्रिमंडळ विस्तारात एम.बी.पाटील यांच्यासह श्यामनूर शिवशंकरप्पा, चन्‍नबसप्पा शिवळ्ळी, धर्मसेना यांना स्थान मिळणार असल्याचे समजते. मात्र, पहिल्या टप्प्यातच स्थान न मिळाल्याने अस्वस्थ झालेले एम.बी.पाटील आता मंत्रिपद स्वीकारण्यास तयार नसल्याने त्यांच्या निकटवर्तींयांकडून सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्रिपद किंवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षद स्वीकारतील, अन्यथा दोन्ही पक्षांच्या विरोधात राहण्याची तयारी चालविली असल्याचे निकटवर्तीयांनी म्हटले आहे.