होमपेज › Belgaon › सभा यशस्वी करण्यासाठी कार्यरत व्हा

सभा यशस्वी करण्यासाठी कार्यरत व्हा

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:48PMबेळगाव : प्रतिनिधी

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे प्रदीर्घ काळानंतर सीमालढा गतिमान करण्यासाठी बेळगाव येथे येणार असून त्यांची जाहीर सभा सीमाबांधवांनी यशस्वी करावी. यासाठी प्रत्येक घटक समितीने कार्यरत व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केले.

शरद पवार यांच्या नियोजित सभेबाबत आढावा बैठकीचे आयोजन रविवारी रामलिंगखिंड येथील रंगुबाई भोसले सभागृहात मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष माजी आ. मनोहर किणेकर होते.

मरगाळे म्हणाले, 31 मार्च रोजी होणारी शरद पवार यांची सभा ऐतिहासीक स्वरुपाची ठरणार आहे. या सभेकडे सीमाभागासह महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातील नागरिकांचे लागून राहिले आहे. यामुळे सभा यशस्वी करण्याची जबाबदारी मराठी बांधवावर आहे. मराठी बांधवांनी सभा यशस्वी करण्यासाठी गल्लीनिहाय बैठकीचे सत्र सुरू करावे. 

माजी आ. मनोहर किणेकर म्हणाले, सभेसाठी किमान एक लाख मराठी बांधव उपस्थित राहणार आहे. यासाठी ज्योती महाविद्यालयाच्या मैदानावर तयारी करण्यात येणार असून याबाबतचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यात येत आहेत. सभा यशस्वी करण्यासाठी फलक, भितीपत्रके, रिक्षा या माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सभेच्या पूर्वतयारीसाठी कार्यालय सुरू करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन मंगळवारी करण्यात येईल.

मध्यवर्ती म. ए. समितीसह घटक समितींच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र करण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, सीमाप्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आणण्यासाठी सीमाबांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र यावे. यावेळी विकास कलघटगी, माजी नगरसेवक गजानन पाटील, राजू मरवे, माजी ता. पं. सदस्य मारुती मरगण्णाचे, प्रकाशबापू पाटील, शिवराज पाटील यांनी विविध सूचना केल्या. व्यासपीठावर माजी ता. पं. सदस्य एस. एल. चौगुले, बी. एस. पाटील उपस्थित होते. बैठकीला श्रीकांत मांडेकर, बाबू कोले आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. आभार माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील यांनी मानले.