Sun, Jul 21, 2019 09:53होमपेज › Belgaon › इंधन करवाढीवर माघार?

इंधन करवाढीवर माघार?

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 08 2018 1:43AMबंगळूर : प्रतिनिधी

चहुबाजूंनी होत असलेल्या टीकेमुळे पेट्रोल आणि डिझेलवर उपकरात केलेली  वाढ मुख्यमंत्री कुमारस्वामी येत्या काही दिवसांत मागे घेण्याची शक्यता आहे. करवाढ मागे घेतली जाण्यासाठी काँग्रेस आग्रही असून, अर्थसंकल्प मंजुरीच्या ठरावावेळी ही मागणी लावून धरली जाणार आहे. 

शेतकर्‍यांना एकूण 34 हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार 30 वरून 32 टक्के केला. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 1 ते दीड रुपया वाढ होणार आहे. मात्र या करवाढीला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. 

एकतर असा निर्णय घेण्यापूर्वी कुमारस्वामींनी समन्वय समिती बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली नव्हती. शिवाय येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस इंधन दरवाढ हा प्रचाराचा मुद्दा करणार आहे. पण कर्नाटकातही दर वाढणार असल्यामुळे काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी कुमारस्वामींना भेटून करवाढ मागे घेण्याच मागणी केली आहे.

येत्या काही दिवसांत करवाढ मागे घेतली जाईल. तसे न झाल्यास पुढच्या आठवड्यात जेव्हा मुख्यमंत्री अर्थसंकल्पाला विधानसभेत मंजुरी मागतील, तेव्हा करवाढ मागे घेण्याची मागणी लावून धरण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

*लोकसभेसाठी रणनीती

आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपविरुद्ध काँग्रेस इंधन दरवाढ हा प्रचाराचा मुद्दा बनवणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर शंभर डॉलरपार असतानाही मनमोहन सिंग सरकारने पेट्रोलचे दर 60 ते 70 रु. यादरम्यान ठेवले होते. मात्र सध्या आंतररष्ट्रीय बाजार कच्चा तेलाचा दर 78 डॉलरवर असतानाही देशात मात्र पेट्रोलचा दर 80 च्या घरात आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या फायद्यासाठी मोदी सरकार कार्यरत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेस भागीदार असलेल्या सरकारने पेट्रोल, डिझेलवरील कर वाढवल्यास ‘कर्नाटकात एक आणि केंद्रात वेगळेच धोरण’ अशी काँग्रेसची अवस्था होण्याची भीती नेत्यांना आहे. हे टाळण्यासाठीच करवाढ रद्द करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला आहे.