Thu, Jun 27, 2019 09:38होमपेज › Belgaon › रिसॉर्ट राजकारण कर्नाटकात नित्याचेच

रिसॉर्ट राजकारण कर्नाटकात नित्याचेच

Published On: May 20 2018 1:41AM | Last Updated: May 20 2018 12:15AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकाचे राजकारण आणि रिसॉर्टस् यांचे अतूट नाते आहे. इतके अतूट की शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनीही येडियुराप्पांना 24 तासांचा अवधी देताना न्यायालयात गंमतीने म्हटले, कुठल्याही पक्षाकडे नाहीत, इतके आमदार रिसॉर्ट मालकाकडे आहेत, त्यामुळे तोही सरकार स्थापनेचा दावा करू शकतो! 2004 पासून तर रिसॉर्ट राजकाणाला गती आली आहे. त्याचा आढावा...

2004 : 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत 224 सदस्यीय विधानसभेत 79 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष बनला होता. पण निवडणूक निकालानंतर 65 जागा जिंकलेला काँग्रेस पक्ष आणि 58 जागा मिळविलेल्या निजदने युती करून एन. धरमसिंग यांच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकार स्थापन केले. यावेळी निजदने आपल्या आमदारांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या विश्‍वासदर्शक ठरावापूर्वी हैद्राबाद येथील गोल्डन पाम रिसॉर्टमध्ये ठेवले होते. 

2006 : 2006 मध्ये निधर्मी जनता दलाचे अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांनी आपले पिताश्री एच. डी. देवेगौडा यांच्या आदेशाप्रमाणे काँग्रेसशी असलेली आघाडी तोडून मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपसमवेत घरोबा केला. यावेळी निजद आणि भाजपने 27 जानेवारी 2006 रोजी राज्यपालांच्या भेटीस जाण्यापूर्वी आपल्या आमदारांना गोल्डन पाम रिसॉर्टमध्ये ठेवले होते. त्यानंतर 9 फेबु्रवारी रोजी विश्‍वासदर्शक ठराव येण्यापूर्वीपर्यंत निजद आमदार गोल्डन पाम रिसॉर्टमध्ये तर भाजप आमदारांनी एलहंका येथील दोड्डीज रिसॉर्टमध्ये राहिले. 

2007 : 2007 मध्ये निजदच्या कुमारस्वामी यांनी 20-20 फॉर्म्युलाचा (भाजप आणि निजदचा प्रत्येकी 20 महिन्यांसाठी मुख्यमंत्री) भंग केल्यामुळे निजद-भाजप युतीचे सरकार कोसळले. त्यानंतर बी. एस. येडियुराप्पा यांनी सत्तेचा दावा करून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी निजदच्या आमदारांनी बिडादी येथील ईगल्टनरिसॉर्टमध्ये वास्तव्य केले तर भाजपचे आमदार दोड्डीज रेसॉर्टमध्ये राहिले. तरीही 19 नोव्हेंबर रोजी येडियुराप्पा यांची 7 दिवसांची मुख्यमंत्रिपदाची कारकीर्द संपुष्टात आली. 

2008 : 2008 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जादुई 113 चा आकडा गाठण्यात फक्‍त तीन आमदार कमी पडले. त्यांनी ऑपरेशन कमळचा प्रभावीपणे वापर करून निजद, काँग्रेस आणि अपक्ष आमदारांना फोडून जादूई संख्या प्राप्त केली. यावेळी आमदारांनी अनेक दिवस नेलमंगला, बिडादी आणि यलहंका येथील पंचतारांकीत हॉटेलात पाहुणचार घेतला. 

2009 : 2009 मध्ये येडियुराप्पा आणि जनार्दन रेड्डी यांच्यात मतभेद निर्माण झाले. रेड्डी यांनी सरकारला सत्तेवरून खेचण्याची धमकी दिली. 2009 मध्ये रेड्डी यांनी आमदारांच्या दोन गटांना राज्याबाहेर पाठविले. आमदारांचा एक गट गोव्यातील रिसॉर्टमध्ये होते तर दुसर्‍या गटाने हैद्राबादमधील पंचतारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्य केले. 

2010  : ज्यावेळी 18 आमदारांनी भाजप सरकारला असलेला आपला पाठिंबा मागे घेतला त्यावेळी भाजपने आपल्या आमदारांना 11 ऑक्टोबर 2010 रोजी आयोजित विश्‍वासदर्शक ठरावापूर्वी अज्ञातस्थळी ठेवले. त्याचबरोबर काँग्रेस आणि निजदनेही आपापल्या पक्षांच्या आमदारांना बंगळूरमधील विविध रिसॉर्टमध्ये ठेवले. 

2011 : बेकायदा खाणप्रकरणी येडियुराप्पा दोषी ठरून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर डी. व्ही. सदानंदगौडा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर प्रतिस्पर्धी छावणीत के. एस. ईश्‍वरप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी प्रयत्न सुरू होताच सदानंद गौडा यांनी घोडेबाजाराचा धोका टाळण्यासाठी आपल्या 80 उमेदवारांना पुन्हा गोल्डन पाम रिसॉर्टमध्ये ठेवले. 2012 : 2012 मध्ये सदानंद गौडा यांना मुख्यमंत्री पदावरून हटविण्यासाठी येडियुराप्पा यांनी आपल्या 40 आमदारांना एलहंका येथील रमणश्री कॉलिफोर्निया रेसॉर्टमध्ये नेले होते.